रस्त्याचे खोदकाम न करता बांधकामाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 11:29 PM2018-03-13T23:29:36+5:302018-03-13T23:29:36+5:30
नव्याने अस्तीत्वात आलेल्या साकोली नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रूपयांची कामे सुरु आहेत. ही कामे अंदाजपत्रकानुसार न होता बोगस पद्धतीने होत आहेत.
आॅनलाईन लोकमत
साकोली : नव्याने अस्तीत्वात आलेल्या साकोली नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रूपयांची कामे सुरु आहेत. ही कामे अंदाजपत्रकानुसार न होता बोगस पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सदर कामे आज नगरपरिषदेने बंद केले असून यापूर्वीही झालेल्या कमाची चौकशी करून संबंधित अभियंत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक रवी परशुरामकर यांनी केली आहे.
नव्यानेच साकोली येथे स्वर्णलता माकोडे ते तिवारी यांच्या घरापर्यंत व दुर्गामंदिर ते गडकुंभली रोडपर्यंत या दोन कामाची सुरुवात करण्यात आली आहे. या कामात पूर्वी डांबररोड जेसीपीने खोदकाम करून ते साहित्य बाहेर फेकायचे होते. त्याठिकाणी ४० एमएम गिट्टी टाकून त्यावर घोटाई करावयाची होती. मात्र कंत्राटदारांनी तसे न करता जुन्याच डांबरीकरणाच्या रस्त्यावर ४० एमएम गिट्टी टाकून त्याच्यावर काम सुरु केले आहे. याची माहिती मिळताच नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरुण मल्लानी, नगरसेवक रवी परशुरामकर, पी.एम. कोटांगले, अनिता पोगळे, नालंदा टेंभुर्णे, जगन उईके, किशोर पोगळे यांनी सदर रस्त्याची पाहणी केली व सदर रस्त्यावर होत असलेले काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सदर कामे ही सद्यस्थितीत अंदाजपत्रकानुसार नसून जुन्याच रस्त्यावर खोदकाम न करता सुरु आहेत. त्यामुळे सदर काम बंद करण्याचे तोंडी सांगण्यात आले आहे.
- धनवंता राऊत, नगराध्यक्ष
यापूर्वीही करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता कामे करण्यात आली आहेत. याची तक्रारही आम्ही केली आहे. मात्र संबंधितांना देयके दिली आहेत. या सर्व कामाची चौकशी करून संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्यावर शासनाच्या निधीची अपव्यय केल्याची चौकशी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.
- रवी परशुरामकर, बांधकाम समिती सदस्य न.प. साकोली