कारखाना सुरू करा, अन्यथा अनुदान परत करा
By Admin | Published: April 13, 2017 12:27 AM2017-04-13T00:27:43+5:302017-04-13T00:27:43+5:30
तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील अनेक वर्षांपासून बंद आहे.
ऊर्जामंत्र्यांचे आदेश : प्रकरण युनिव्हर्सल फेरो कारखान्याचे
भंडारा : तुमसर तालुक्यातील माडगी येथील युनिव्हर्सल फेरो कारखाना मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. हा कारखाना सुरू करण्यासाठी अभय योजनेतून १२८ कोटी रूपये देऊन मार्चपर्यंत कारखाना सुरू करण्याची अट टाकली होती. परंतु कारखाना सुरू करण्यासाठी कंपनी मालकाने अडचणी सांगितल्या. त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी पुढाकार घेऊन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे बैठक बोलाविली. या बैठकीत कारखाना सुरू करण्याबाबत तोडगा न निघाल्यामुळे कारखाना सुरू करा अन्यथा अनुदान परत करा, असा आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कारखाना व्यवस्थापनाला दिला.
सन २०१६ मध्ये हा कारखाना बंद करण्याची परवानगी व्यवस्थापनाने मागितली होती. त्या निर्णयाच्या विरोधात कामगार न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्या निर्णयाचे विरोधात व्यवस्थापन उच्च न्यायालयात गेले. दरम्यान कंपनीला ऊर्जा विभागामार्फत विद्युत बिल माफ करण्यासाठी १२८ कोटी रूपये अभय योजनेत मार्च २०१७ पर्यंत कारखाना सुरू करण्याचे अटीवर देण्यात आले होते.
ऊर्जा विभागाने अनुदान दिल्यावर कंपनीने अॅक्सीस बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्ज घेताना व्यवस्थापनाने बँकेसोबत जो करार करून दिलेला होता. मार्चपर्यंत कारखाना सुरू न केल्यामुळे बँकेने लालवाणी या व्यक्तीचे माध्यमातून स्लॅक विकण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान व्यवस्थापन आणि युनियनमध्ये समजोता झाला. न्यायालयीन प्रकरणाबाबत २००६ पासुन कामगारांना नुकसानभरपाई देण्याचा कंपनीने कामगारांसोबत समजोता केला आहे. बँकेने करारपत्रानुसार कर्जरूपाने दिलेले पैसे वसुल करण्यासाठी स्लॅक विकण्याची कार्यवाही सुरू केली असली तरी कारखाना सुरू करण्याबाबत कंपनीने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. त्यापूर्वी आ.वाघमारे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे यांची बैठक भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)