पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:33 AM2021-04-15T04:33:43+5:302021-04-15T04:33:43+5:30
ग्रामीण रुग्णालयानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ चाचणी करून तात्पुरत्या स्वरूपात औषध उपचार केला जातो. त्यानंतर सदर रुग्णाला गृह विलगीकरणाचा ...
ग्रामीण रुग्णालयानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ चाचणी करून तात्पुरत्या स्वरूपात औषध उपचार केला जातो. त्यानंतर सदर रुग्णाला गृह विलगीकरणाचा सल्ला दिला जातो. त्यानंतर त्यांच्याकडे अपेक्षित लक्ष पुरविले जात नाही. अशावेळी स्थानिक ठिकाणी जर कोविड रूग्णालय सुरू झाले तर निश्चितच ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळेल. ग्रामीण भागातील बरेच रुग्ण कोविडच्या आजाराने उपचार अभावी मृत्यूमुखी पडले आहेत. काही तर नुसत्या खर्चाचा आकडा डोईजड होत असल्याच्या कारणाने खाजगीतील उपचार टाळत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांना दिवसभरातून कित्येक रुग्णांचे व रुग्णांच्या नातेवाईकांचे भ्रमणध्वनीवरून आरोग्य व्यवस्था विषयी विचारणा केली जाते. त्यामुळे पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जर का कोविड सेंटर सुरू झाले तर निश्चितच गोरगरीब रुग्णांना सेवा मिळण्यास मोठी सुविधा होईल.
जिल्हाधिकारी यांनी पुरविलेल्या निर्देशानुसार शहरातील मोठी खासगी व शासकीय रुग्णालय फुल्ल झालेली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या दवाखान्यात भरती होण्याचे संकट उभे झालेले आहे. जिल्ह्यातील एकंदर परिस्थिती अभ्यास केला असता तालुकास्तरावरील व मोठ्या गावातील आरोग्य केंद्रात अपेक्षित मनुष्यबळासह कोविड सेंटर सुरू करावे . अशी अपेक्षा व मागणी विनायक बुरडे यांनी निवेदनातून केली आहे.
जिल्हास्तरावर पुन्हा नव्याने दोनशे बेडचे सेंटर सुरू करण्याच्या हालचाली दिसत आहेत. अशाच पद्धतीने ग्रामीण भागात सुद्धा वरिष्ठ लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पुढाकारातून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ग्रामीण भागात सुद्धा कोविड सेंटर सुरू करावे. खासदार प्रफुल पटेल यांनी सुद्धा पुढाकार घेत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला सहकार्य करावे. असे लेखी निवेदनातून मागणी केलेली आहे.