मोहरणा-कुडेगाव बससेवा तत्काळ सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:34 AM2021-09-13T04:34:18+5:302021-09-13T04:34:18+5:30
प्राप्त माहितीनुसार, लाखांदुर तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी गावात शैक्षणिक सुविधा पुरेशी नसल्याने उच्च शिक्षणासाठी ...
प्राप्त माहितीनुसार, लाखांदुर तालुक्यात ८९ गावांचा समावेश असून ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी गावात शैक्षणिक सुविधा पुरेशी नसल्याने उच्च शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी येत असतात तसेच नागरिकांनादेखील विविध शासकीय कामकाजांकरीता लाखांदूर या तालुक्याच्या ठिकाणीच जावे लागते. मात्र, तालुक्यातील बऱ्याचश्या गावांत बससेवा सुरू नसल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मोहरणा कुडेगाव मार्गे बससेवा सुरू होती. मात्र, गत २ वर्षांपूर्वी कोरोना पार्श्वभूमीवर सर्वत्र शासननिर्देशानुसार संचारबंदी व जमावबंदी करण्यात आली. सदर संचारबंदीनुसार मोहरणा-कुडेगाव-लाखांदूरमार्गे सुरू असलेली बससेवा बंद करण्यात आली. मध्यंतरीच्या कालखंडात तालुक्यात ९ ते १२ वी चे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र त्यावेळी देखील बससेवा सुरू करण्यात आली नसल्याची माहिती आहे.
मानव विकास बससेवेसह या मार्गावरील अन्य बससेवादेखील बंद पडल्याने विद्यार्थ्यांसह या मार्गावरील नागरिकांना शासकीय, निमशासकीय व खासगी कामे पार पाडताना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या मार्गावरील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या शासकीय, निम शासकीय व खासगी कामे पार पाडण्याकरीता मोहरणा-कुडेगाव मार्गावरील बससेवा तत्काळ सुरू करा, अशी मागणी काँग्रेसचे मोहरणा जि.प. क्षेत्र प्रमुख विलास पिलारे यांनी केली आहे.