पालोरा व करडी येथे रोहयो कामे सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:33 AM2021-04-12T04:33:28+5:302021-04-12T04:33:28+5:30
करडी (पालोरा) : शासनाकडून ‘ब्रेक द चेन’साठी जिल्ह्यात २५ दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. कोरोना संक्रमण सतत ...
करडी (पालोरा) : शासनाकडून ‘ब्रेक द चेन’साठी जिल्ह्यात २५ दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन सुरु करण्यात आला आहे. कोरोना संक्रमण सतत वाढत असल्याने कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे आरोग्यासह रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तळहातावर पोट असणाऱ्यांची अडचण वाढल्याने कामावर येण्यास इच्छुक मजुरांची अँटिजेन तपासणी करुन रोहयो कामे सुरु करण्याची मागणी अल्पभूूधारक शेतकरी व मजुरांनी केली आहे.
देशात वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. वर्षभरात अनेकांचा रोजगार बुडाला. घरखर्च व अन्न-धान्याच्या खरेदीत पैसा संपला. आजही कोरोनाचा सर्वाधिक फटका मजुरांना सहन करावा लागत आहे. एकीकडे रोजगार बंद होत असताना दुसरीकडे महागाई सतत वाढत आहे. त्यामुळे गरिबांनी करावे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. खरीप हंगाम संपल्यानंतर रोजगाराचे दुसरे साधन उपलब्ध नाही. कोरोनामुळे शहरात मिळणारे मोलमजुरीचे काम बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारांची मोठी फौज करडी परिसरात दिसून येत आहे. परंतु, एप्रिल महिना सुरु होऊनही करडी व पालोरा येथे रोहयो कामे सुरु झालेली नाहीत. मजुरांची पोटापाण्याची अडचण लक्षात घेता, कोरोना चाचणी करून रोहयो कामे सुरु करण्याची मागणी मजुरांकडून होत आहे.