राज्य शिक्षण आयुक्तांनी खराशी शाळेला भेटून साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2023 06:30 PM2023-04-21T18:30:34+5:302023-04-21T18:30:47+5:30
गुणवत्ता विकासात राज्यात नावलौकिक प्राप्त करणारी जिल्हा परिषदेच्या खराशी शाळेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी भेट दिली.
देवानंद नंदेश्वर
भंडारा : गुणवत्ता विकासात राज्यात नावलौकिक प्राप्त करणारी जिल्हा परिषदेच्या खराशी शाळेला महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी भेट दिली. राज्यातील सात मॉडेल शाळांमध्ये सहभागी असलेल्या विदर्भातील एकमेव खराशी शाळेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती आयुक्तांनी घेतली. प्रत्येक वर्गातील मुलांची भेट घेऊन त्यांच्याशी हितगूज साधली.
लाखनी तालुक्यातील खराशी शाळेची जगात ओळख आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी समाज व पालक संपर्क, शालेय व सहशालेय उपक्रम, शालेय परिपाठ, इंग्रजी व सामान्यज्ञानाचे उपक्रम, १०० टक्के विद्यार्थी उपस्थिती, लिंग समानता, मुबलक भौतिक सुविधा या सर्व बाबींचे निरीक्षण करून कौतुक केले. तसेच शालेय ज्ञानाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो, यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी नागपूर शिक्षण उपायुक्त वैशाली जामदार, अमरावती शिक्षण उपायुक्त पटवे, भंडारा डायट प्राचार्य राधा अतकरी, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापसे, पंचायत समिती सदस्य योगिता झलके, वर्धाचे शिक्षणाधिकारी कोल्हे, भंडाराचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, संजय डोर्लीकर आदी उपस्थित होते.