राज्य शासनाचे पशुचिकित्सालय व्हेंटिलेटरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:35 AM2021-04-27T04:35:51+5:302021-04-27T04:35:51+5:30
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. नगदी व्यवसाय म्हणूनही गाय, म्हशी, शेळ्या, कोंबड्या मोठ्या संख्येने पाळतात. त्यातून ...
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाकडे अनेक शेतकरी वळले आहेत. नगदी व्यवसाय म्हणूनही गाय, म्हशी, शेळ्या, कोंबड्या मोठ्या संख्येने पाळतात. त्यातून त्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. शासनाने पशूंच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद व राज्य शासनाने पशुचिकित्सालय सुरू केले आहे. प्रत्येक तालुक्यात या पशू चिकित्सालयाची संख्या बऱ्यापैकी आहे. राज्य शासनाच्या पशू चिकित्सालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहेत. रिक्त पदांची भरती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार आला आहे. एकाच डॉक्टरकडे दोन ते तीन दवाखान्यांचा अतिरिक्त कारभार आहे. ग्रामीण भागात पशूंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
शासनाच्या अनेक योजना पशूंसाठी राबवाव्या लागतात. लसीकरण करणे, पशुपालकांना मार्गदर्शन करणे तसेच वरिष्ठ स्तरावर ऑनलाईन माहिती पाठविण्याचे काम या डॉक्टरांना स्वतःच करावे लागते. पशुवैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर अथवा पदोन्नती झाल्यानंतर ते पद रिक्त राहते. परंतु राज्य शासनाकडून तत्काळ पद भरण्यात येत नाहीत. त्यामुळे अनेक पशुचिकित्सालयात डॉक्टरांची व इतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत.
बॉक्स
गोबरवाही येथील पशुचिकित्सालय बंद
गोबरवाही हा परिसर आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या परिसरात गोबरवाही, हेटी टोला, गणेशपूर, पवनार खारी, सुंदरटोला, चिख, सीतासावंगी, खंदाड, धामणेवाडा, खैरटोला, सौदेपूर, कारली इत्यादी गावांचा समावेश आहे. गोबरवाही येथील दवाखाना बंद आहे. त्यामुळे येथील पशुपालकांना खाजगी पशू परिचराकडून उपचार करावा लागत आहे. याकरिता पशुपालकांना जवळचे पैसे खर्च करावे लागतात. पशुपालकांना औषधे खरेदी करावी लागतात. कधी पशूंचे आरोग्य धोक्यातही येते. त्यामुळे पशुपालकांत असंतोष आहे. राज्य शासनाने तत्काळ ही रिक्त पदे भरावी अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.