कामे सुरू असतानाच राज्य महामार्ग उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:00 PM2018-03-27T23:00:58+5:302018-03-27T23:00:58+5:30
तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
लाखांदूर : तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे.
मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर ते अर्जुनी (मोरगाव) या १४ ते २८ कि.मी. लांबीच्या या राज्य महामार्गाच्या देखभाल व दुरूस्तीसाठी सन २०१७-१८ अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांनी तीन कोटी रूपयांचा निधी खेचून आणला. १० मार्च रोजी भुमिपुजन होताच १० दिवसातच या मार्गाच्या कामांना सुरूवात करण्यात आली़. मात्र ज्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सद्यस्थितीत आसोला, परसोडी (नाग) परिसरात कामे सुरू असून प्रथम या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी केली जात आहे. त्यात डांबराचे कमी प्रमाण व रोलर न फिरविल्यामुळे डांबरीकरण उखडले असून बारीक गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. भरधाव वाहनांच्या चाकाला ही गिट्टी चिपकूप छोट्या वाहनचालकांना धोकादायक ठरत आहे. यामुळे बारीक चुरी असल्याने प्रवाशांच्या डोळ्यात उडून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
भुमिपुजन कार्यक्रमात आमदार बाळा काशिवार यांनी या मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, यासाठी प्रत्येक गावकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले होते. त्यामुळे या परीसरातील ग्रामस्थांनी या मार्गाचे काम चांगल्या दर्जाचे करून निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत सदर कंत्राटदाराला विचारले असता ‘काम चांगल्या दर्जाचे सुरू असून काम सुरू असताना वाहतुकीमुळे डांबर उखडले’ असल्याचे त्यांनी सांगितले.
या महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे. मात्र काम सुरू असताना जडवाहतुकीच्या वाहनांमुळे उखडला आहे.
- आर.एम.ठाकूर, शाखा अभियंता, बांधकाम विभाग लाखांदूर.
संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई झालीच पाहिजे.
- शिवाजी देशकर,
उपसभापती पं.स.लाखांदूर.
संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- राहुल राऊत,
माजी उपसरपंच ओपारा.