वनविभागाच्या निवासस्थानात जनावरांचा मुक्काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:06 PM2019-06-03T23:06:37+5:302019-06-03T23:06:55+5:30
वनविभागाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या शासकीय निवासस्थानात कुणीही राहायला तयार नाही. परिणामी या निवासस्थानात मोकाट जनावरांनी मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे उघडकीस आला आहे.
निश्चय रामटेके।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडउमरी : वनविभागाने लाखो रुपये खर्च करुन बांधलेल्या शासकीय निवासस्थानात कुणीही राहायला तयार नाही. परिणामी या निवासस्थानात मोकाट जनावरांनी मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे उघडकीस आला आहे.
साकोली तालुक्यातील गोंडउमरी येथे वनविभागाने लाखो रुपये खर्च करुन वननिवास बांधले. परंतु गत पाच वर्षांपासुन या निवासस्थानात एकही अधिकारी राहायला आला नाही. लाखो रुपयांची ही इमातर आता बेवारस झाली आहे. अधिकारी आपल्या स्वत:चाच घरी राहत आहे. त्यामुळे या वननिवासात मोकाट जनावरांनी मुक्काम ठोकला आहे. दिवसभर या ठिकाणी जनावरे ठिय्या देवून असतात.
वनविभागाचे कर्मचारी नियमित कर्तव्यावर येतात. परंतु कुणाचेही या निवासस्थानाकडे लक्ष नाही. याठिकाणी असलेल्या इमारतीची आता दुरावस्था झाली आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याला शासकीय निवासस्थानात राहणे बंधनकारक आहे. परंतु वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने कुणीही येथे राहत नाही. हा प्रकार गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असून कुणीही लक्ष देत नाही.
ग्रामीण भागातील जनतेला अधिकारी व कर्मचारी वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने ठिकठिकाणी निवासस्थाने बांधली आहेत. मात्र शहरात राहायची सवय पडलेली अधिकारी व कर्मचारी जंगलातील निवासस्थानात राहायला तयार नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करुन बांधलेले निवासस्थाने ओस पडली आहेत.
कोणताच कर्मचारी मुख्यालयी राहत नाही
वनविभागासोबतच इतर विभागाचे कर्मचारीही मुख्यालयी राहत नसल्याचे साकोली तालुक्यात दिसून येते. तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस आदी कर्मचारी शहराच्या ठिकाणाहून जाणे-येणे करतात. रुग्णांच्या सेवेसाठी नियुक्त केलेले डॉक्टरही शहरातूनच जाणे-येणे करतात. याचा त्रास मात्र ग्रामीण जनतेला सोसावा लागत आहे.