स्टील, सिमेंटचे भाव उतरले; घरांच्या दराचे काय होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 05:00 AM2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो; परंतु वाढत्या महागाईने घराचे स्वप्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : स्वत:चे घर असावे, असे स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो; परंतु वाढत्या महागाईने घराचे स्वप्न अपूर्ण राहते की काय, असे जाणवते. मात्र, बिल्डिंग मटेरियलच्या दरामध्ये घट झाल्याने बांधकाम क्षेत्रात वेग येईल, असे जाणवत आहे. मात्र, घरांच्या किमतीत घट होईल, याची शाश्वती नाही.
परिणामी, स्टील, सिमेंट, विटा यांचे भाव थोडेफार उतरले तरी घरांच्या किमती जशाच्या तशा आहेत. त्यामुळे भंडारासारख्या शहरात तरी घरांच्या किमती कमी होतील, असे म्हणणे योग्य वाटणार नाही. नोटबंदी व जीएसटी नंतर जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठा परिणाम जाणवला होता. आता बांधकाम साहित्यांच्या दरातही थोडीफार घट झाल्याचे दिसून येत आहे.
व्यापारी म्हणतात...
- तीन महिन्यांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास स्टील सिमेंटच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. ८५ ते ९० रुपये किलो दराने मिळणारे स्टील कमी झाले आहे. हा दर ६४ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. रेतीचे दर मात्र गगनाला भिडल्याने व घाटांचा लिलाव न झाल्याने समस्या वाढली आहे.
आता घरांच्या किमती कमी व्हाव्यात
सहा महिन्यांपूर्वी घर बांधकामाला सुरुवात केली होती; परंतु अजूनपर्यंत काम पूर्ण झाले नाही. मध्यंतरी स्टील व विटांचे भाव वाढले होते. खडीच्या भावातही वाढ झाल्याने काम थांबविले होते. मात्र, पुन्हा एकदा दर उतरले तरी घराच्या किमती कमी झाल्या नाहीत.
- मंगेश कोरे, भंडारा
बांधकाम साहित्याचे दर घसरले म्हणून जमिनीचेही भाव कमी होतील, असे काही ठरलेले नाही. आधीच प्राॅपर्टी डिलींच्या कामात मागील काही वर्षांपासून मंदी आली आहे. पुन्हा घरांच्या किमती कमी होतील, अशी आशा ठेवणे योग्य नाही, असे वाटते.
- विलास गोटेफोडे, लाखनी
प्रती चौरस फूट १८० रुपये दर
भंडारासारख्या शहरात घर बांधायचे असेल तर कंत्राटदारांनी विविध दर ठरविले आहेत. सरासरी खालच्या म्हणजेच ग्राऊंड फ्लोअरचे बांधकाम करायचे असेल तर प्रती चौरस फूट १६० ते १८० व वरच्या माळ्याच्या बांधकामासाठी २०० रुपये प्रती फूट मोजावे लागतात.