विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपत्ती निवारण समितीचे एक पाऊल पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:36 AM2021-07-30T04:36:42+5:302021-07-30T04:36:42+5:30
करडी (पालोरा) : कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागे पडत असल्याची भावना पालकांत आहे. अशातच ...
करडी (पालोरा) : कोरोना महामारीमुळे दीड वर्षांपासून प्राथमिक शाळा बंद आहेत. विद्यार्थी मागे पडत असल्याची भावना पालकांत आहे. अशातच शासनाने आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधी निर्णयाची जबाबदारी स्थानिक आपत्ती निवारण समितीला दिली. मुंढरी बुज येथील समितीने पालकांच्या भावनांचा व विद्यार्थ्यांच्या हिताचा आदर ठेवीत ग्रामपंचायत, हनुमान मंदिर व दुर्गा मंदिरात आठवड्यापूर्वी तिसरी ते पाचवीपर्यंतची शाळा सुरू केली. अध्यापनाचे कार्य सुरू झाल्याने शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
शासनाने कोरोना महामारी आटोक्यात येताच स्थानिक स्तरावर आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या निर्देशानुसार मुंढरी येथे सरपंच एकनाथ चौरागडे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समितीची सभा झाली. सभेला करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. जी. तलमले, उपसरपंच जयपाल पडोळे, शाळा समिती अध्यक्ष मोरेश्वर गोमासे, राजेश शहारे, ग्रामसेवक अशोक बागडे, तलाठी मरस्कोल्हे, केंद्रप्रमुख, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सोड, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नोमेश शेंडे, ग्रामपंचायत सदस्य, पालक व ग्रामवासी उपस्थित होते.
मुंढरी येथे सहा महिन्यांपासून एकही कोरोना रुग्ण नाही. मग, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न सभेत उपस्थित झाला. यावर पालकांचे व शिक्षकांचे मत विचारात घेत समितीचे अध्यक्ष एकनाथ चौरागडे यांनी वर्ग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे धाडस दाखविले. वर्ग आठवी ते दहावीसांबतच तिसरी ते पचवीपर्यंतचे अध्यापनाचे कार्य सुरू करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. अन्य वर्गासाठी वेळीच निर्णय घेण्याचेही ठरविण्यात आले. प्रस्तावास माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता चौरागडे, के. बी. चौरागडे, दिलीप लाडसे यांनी प्रतिसाद दिला. कोरोना नियमांचे पालन करीत हनुमान मंदिरात तिसरी, दुर्गा मंदिरात चवथी, तर ग्रामपंचायतीमध्ये पाचवीचे वर्ग आठवड्यापासून सुरू आहेत. पिण्याचे पाणी, पंखे आदींची सुविधा पुरविण्यात आली आहे.
शाळेला स्पर्धा परीक्षा संचाची भेट
हायस्कूल व प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू झाल्याने आनंदित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सरिता चौरागडे, के. बी. चौरागडे, सरपंच एकनाथ चौरागडे, उपसरपंच जयपाल पडोळे यांनी प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी नवोदय, शिष्यवृत्ती, एमएनएमएस व एनटीएस आदी परीक्षांची प्रत्येकी पाच संच शाळांना भेट दिले.
कोट
कोरानामुळे विद्यार्थी व पालकांत निराशेची भावना होती. गावात सहा महिन्यांपासून रुग्ण नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शविली. पालकांनी स्वयंघोषणापत्र भरून दिले. शिक्षकांनी पुढाकार घेतल्याने मुंढरी प्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरू करणारी पहिले गाव ठरले आहे. इतर गावांनाही विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय घेण्याची गरज आहे.
- एकनाथ चौरागडे, सरपंच मुंढरी
290721\img_20210728_122748.jpg~290721\img_20210728_122146.jpg~290721\img_20210728_122428.jpg
ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान~ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान~ग्रामपंचायत, हनुमान व दुर्गा मंदिरात आरंभिले प्राथमिक विद्यादान