कर्कापुरात पुन्हा आगीच्या घटनेसह दगडांचा मारा
By admin | Published: April 18, 2017 12:38 AM2017-04-18T00:38:39+5:302017-04-18T00:38:39+5:30
तुमसर तालुक्यातील कर्कापुरात मागील चार दिवसांपासून घर, गोठ्यांना रहस्यमयरीत्या आग लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
सायंकाळपासून अघोषित संचारबंदी : ग्रामस्थांचा जीव धोक्यात
तुमसर : तुमसर तालुक्यातील कर्कापुरात मागील चार दिवसांपासून घर, गोठ्यांना रहस्यमयरीत्या आग लागत असल्याच्या घटना घडत आहेत. आता दोन दिवसांपासून दगडांचा वर्षाव होत आहे. शेंदूर फासलेल्या दगडांच्या वर्षावामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी मयुर आगाशे यांच्या घराला आग लागली.
१३ एप्रिल रोजी महादेव पडोळे, प्रदीप आगाशे, महेश बुध्दे, मुकुंदा आगाशे यांच्या घर व तणसाच्या ढिगाला आग लागल्याच्या घटना घडल्या. पुन्हा १४ एप्रिलला महादेव पडोळे व माधोराव आगाशे यांच्या घरी आग लागली.
१७ एप्रिलला मयुर आगाशे यांच्या घराला आग लागली. यात घर जळुन खाक झाले. १७ च्या मध्यरात्री २ ते ३ च्या सुमारास मोठे दगडांचा मारा करण्यात आला. या दगडांना रंगवजा शेंदूर, काळसर डाग पडलेले आहेत. दगडांच्या माऱ्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
दोन दिवसापूर्वी आमदार चरण वाघमारे यांनी कर्कापूर गावाला भेट दिली होती. ग्रामस्थांशी चर्चा केली. तालुका व जिल्हा प्रशानाला याबाबत त्यांनी माहिती दिली. ग्रामस्थांना आमदार वाघमारे यांनी धीर दिला. नायब तहसीलदार एन. पी. गौंड यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर पुन्हा घरांना आग लागणे व दगडांचा वर्षाव सुरु झाला. जादूटोणा व भानामतीचा हा प्रकार सुरु असल्याची गावात चर्चा सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने येथे तज्ज्ञांचे पथक तथा अंधश्रद्धा निर्मुलन समितीला पाचारण करण्याची गरज आहे. दररोज यापुढे कुणाच्या घराला आग लागेल व दगडांच्या माऱ्यात आपला जीव तर जाणार नाही या भीतीने सायंकाळी ७ वाजतानंतर गावात अघोषित संचारबंदी लागू होते.
गावातील युवक येथे रात्री पहारा देत आहेत. पंरतु प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेण्याची खरी गरज आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी येथे आग व दगडांचा मारा झाल्याची घटना झाली होती, असे ग्रामस्थ सांगतात. कर्कापुरात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्याने आगीच्या घटना घडतात असे सांगण्यात येते. पंरतु तणसाच्या ढिगाला वरुन आग कशी लागत आहे. असा प्रतिप्रश्न येथील ग्रामस्थ करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)