रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:35 AM2021-04-21T04:35:18+5:302021-04-21T04:35:18+5:30
भंडारा : जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या सोबत चर्चा केली. खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सामान्य ...
भंडारा : जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या सोबत चर्चा केली. खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या सामान्य रुग्णांना उपचार मिळावेत आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्यात यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला.
जिल्ह्यात अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये पैशाच्या हव्यासापोटी सर्वसामान्य परिस्थितीतील कोरोना रुग्णांना दाखल केले जात नाही. त्यामुळे बेड न मिळल्याने अनेक रुग्ण उपचाराअभावी दगावत आहेत. त्यासाठी खाजगी कोविड रुग्णालयातील ५० टक्के बेड जिल्हाधिकाऱ्यानी ताब्यात घेऊन गरजू रुग्णांना बेड उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार सुरु असून रुग्णांच्या नावावर इंजेक्शन मिळवून काळ्याबाजारात विकले जात आहेत. यावर आळा घालण्यासाठी दररोज रुग्णालयांकडून रेमडेसिवीरची मागणी व ज्या रुग्णांना हे इंजेक्शन लावण्यात आले त्यांच्या नावाची यादी वेबसाईटवर प्रकाशित करावी.
बॉक्स
रुग्णालयांमध्ये होणार १२०० सिलेंडरचा पुरवठा
सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्ण दगावत आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यानी मान्य केले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात ६०० सिलेंडर तर तुमसर, साकोली व पवनी येथील उपजिल्हा रुग्णालय दर्जाच्या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी २०० अशा एकून १२०० सिलेंडर्सचा पुरवठा केला जाणार आहे. यासंदर्भात सनफ्लॅग येथील ऑक्सीजन प्लांटला भेट देऊन तेथील साठ्याची आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पाहणी केली.
बॉक्स
पवनी, भंडाऱ्यात निर्जंतुकीकरणाचे निर्देंश
पवनी व भंडारा शहरासह या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक वाॅर्डामध्ये निर्जंतुकीकरणाचे निर्देश आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्हा व नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाने २०१९-२० मध्ये कोरोना प्रतिबंधात्मक काय उपाययोजना केली व त्यावर किती खर्च झाला याचा लेखी अहवाल सुध्दा मागविला आहे.