मालवाहतूक गाड्यांचा स्थानकावर तासन्तास थांबा
By admin | Published: November 23, 2015 12:34 AM2015-11-23T00:34:04+5:302015-11-23T00:34:04+5:30
प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर ...
प्रवासी थांब्याच्या ठिकाणी मालवाहू थांबतात : जंक्शन असून तुमसर रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव
तुमसर : प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे तुमसर रोड रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक एकवर प्रवासी रेल्वेगाड्याऐवजी मालवाहू गाड्या तासनतास उभ्या राहत असल्याचे चित्र आहे. यामुळे लहानमुले वयस्क मंडळींना कमालीचा शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. जंक्शन रेल्वे स्थानकाच्या सोयीसुविधा या रेल्वे स्थानकावर नाही, हे विशेष.
तुमसर रोड रेल्वेस्थानक हे जंक्शन स्थानक आहे. नागपूर ते गोंदिया दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे स्थानक असून रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक महसूल येथून जाते. मेल व एक्सप्रेस गाड्यांचा येथे थांबा आहे. दररोज हजारो रेल्वे प्रवाशी येथून ये-जा करतात, पंरतु डाऊन मार्गावरील प्रवासी रेल्वे गाड्या प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लँटफार्म क्रमांक एकवर न घेता प्लॅटफार्म क्रमांक दोनवर तासन्तास उभ्या राहतात. अप मार्गावरील गाड्या प्लटफार्म क्रमांक तीनवर उभ्या राहतात. या रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशांची प्रचंड गर्दी राहते. परंतु रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
लहान मुले, महिला, वृद्धांना पायऱ्या असलेल्या फूटब्रीजवरुन चढणे आणि उतरणे कमालिचे त्रासाचे ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकाच्या दर्जानुसार विना पायऱ्याचे फूटवे-ब्रीज तयार करण्याची गरज आहे. अपंग व वृद्धांकरिता चारचाकी वाहन या रेल्वे स्थानकावर दिसत नाही. रुळ ओलांडून हे वाहन जाणार सुध्दा नाही. मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याची गरज येथे आहे. इलेक्टॉनिक डिसप्ले येथे काढून ठेवण्यात आले. त्याऐवजी पेंटीग केलेले बोर्ड येथे लावण्यात आले आहेत. रात्रीच्यावेळी ते बोर्ड दिसत नाही, यालाच आधुनिकीकरण म्हणायचे का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)