साकोलीत तासभर रास्ता रोको
By admin | Published: July 19, 2015 12:40 AM2015-07-19T00:40:15+5:302015-07-19T00:40:15+5:30
आमदार बाळा काशीवार यांना माथनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ साकोली येथील ...
प्रकरण काशीवार यांना मारहाणीचे : टायर जाळून केला घटनेचा निषेध
साकोली : आमदार बाळा काशीवार यांना माथनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ साकोली येथील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारला रात्री ११ वाजता राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. त्यानंतर काही काळ रास्ता रोको केला. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
साकोलीचे आ.काशीवार हे काल नागपूरहून साकोलीला येत असताना माथनी टोलनाक्यावर त्यांना टोल कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. यात आ.काशीवार जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा निषेध म्हणून रस्त्यावर टायर जाळून महामार्ग तासभर रोखून धरला. यावेळी साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे पोलीस कुमक घेऊन तैनात होते. (तालुका प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा - काशीवार
घडलेली घटना वाईट आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीवर हात उचलायला टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी विचार केला नाही तिथे सर्वसामान्याची काय अवस्था असेल. त्यामुळे आपण कायद्याच्या चाकोरीतुन हा लढा लढायचा. उद्या दि. २० रोजी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेऊन संयम बाळगावा, असे आवाहन आमदार काशीवार यांनी केले.