घाटांचा लिलाव करून रेती तस्करी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:06 AM2021-02-06T05:06:52+5:302021-02-06T05:06:52+5:30
तुमसर : जिल्ह्याचे वैभव असलेली वैनगंगा आणि बावनथडीसह विविध नद्यांचे पात्र रेती तस्कर अहोरात्र रेतीचा प्रचंड उपसा करीत असल्याने ...
तुमसर : जिल्ह्याचे वैभव असलेली वैनगंगा आणि बावनथडीसह विविध नद्यांचे पात्र रेती तस्कर अहोरात्र रेतीचा प्रचंड उपसा करीत असल्याने पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने या रेती घाटावरून आता स्थगितीही उठविली असताना जिल्हा प्रशासनाकडून घाटाचे लिलाव होणे अपेक्षित होते मात्र अजूनपर्यंत रेती घाटाचे लिलाव न झाले नाहीत. परिणामी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच रेती तस्कराना रान मोकळे मिळत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधून जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी निवेदनातून केली आहे.
भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेली बावनथडी व वैनगंगा नदी वाहते. या नद्यांतील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे महसूल अधिकारी व पोलिसांच्या उघड्या डोळ्यासमोरूनच रेतीची वाहतूक केली जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते. रेती तस्कर हे सोन्याची अंडी देणारे कोंबडी ठरत असल्याने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यात सगळीकडे पहावयास मिळत आहे. तुमसर तालुक्यातील अकराही रेतीघाटांवर सध्या तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. उत्खननासाठी येथे जणू स्पर्धा लागल्याचे दिसत आहे.
दिवसाढवळ्या रेतीच्या ट्रकची वाहतूक होत आहे. खुलेआम रेतीतस्करी होत असताना कुणीही त्यात कारवाईसाठी पुढे येत नाही. उलट वेळेवर रसद पोहचली नाही तर मात्र कारवाईचा सोपस्कार पाडला जातो. या व्यवसायात अनेकांची भागीदारी आहे. त्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आहे. येथे शासनाचा महसूल पूर्णतः बुडविला जात आहे. शासनाने याकडे गंभीरतेने विचार करून जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करण्याची विनंती वजा तक्रार काँग्रेसचे जिल्हा महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी केले आहे.