रेती घाटाचे लिलाव करून रेती तस्करी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:07 AM2021-02-06T05:07:08+5:302021-02-06T05:07:08+5:30
भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेली बावनथडी व वैनगंगा नदी वाहते. या नद्यातील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्य ...
भंडारा जिल्ह्यात विशाल पात्र असलेली बावनथडी व वैनगंगा नदी वाहते. या नद्यातील रेती विदर्भातच नव्हे तर लगतच्या मध्य प्रदेशातही प्रसिद्ध आहे. त्यामुळे या नदीपात्रातून रेती उत्खननासाठी मोठी चढाओढ असते. सध्या जिल्ह्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. मात्र असे असताना प्रत्येक घाटावर ट्रक, ट्रॅक्टर आणि टिप्पर द्वारे महसूल अधिकारी व पोलिसांच्या उघड्या डोळ्यासमोरूनच रेतीची वाहतूक केली जाते. सर्व नियमांना बगल देत जेसीबीने उत्खनन केले जाते. हीच परिस्थिती जिल्हाभर पहावयास मिळत आहे. तुमसर तालुक्यातील अकराही रेतीघाटावर सध्या तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे. उत्खननासाठी येथे स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. दिवसाढवळ्या रेतीच्या ट्रकची वाहतूक होत आहे. खुलेआम रेतीतस्करी होत असताना कुणीही त्यात कारवाईसाठी पुढे येत नाही. उलट वेळेवर रसद पोहचली नाही तर मात्र कारवाईचा सोपस्कार पाडला जातो. या व्यवसायात अनेकांची भागीदारी आहे. त्यात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आहे. येथे शासनाचा महसूल पूर्णतः बुडविला जात आहे. शासनाने याकडे गंभीरतेने विचार करून जिल्ह्यातील रेती घाटाचा लिलाव करण्याची मागणी गौरीशंकर मोटघरे यांनी केले आहे.