पांडे महालाची फेरफार प्रक्रिया थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:46 AM2017-07-21T00:46:18+5:302017-07-21T00:46:18+5:30
विदर्भाचे भूषण असलेल्या ऐतिहासीक पांडे महालाची काही महिन्यांपुर्वी विक्री करण्यात आली. या महालाच्या फेरफार
पत्रपरिषदेत आरोप : महाल बचाव कृती समितीचे अधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विदर्भाचे भूषण असलेल्या ऐतिहासीक पांडे महालाची काही महिन्यांपुर्वी विक्री करण्यात आली. या महालाच्या फेरफार प्रक्रियेवर बुधवारी उमेश पांडे व अक्षय पांडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान, या महालाची विक्री बनावट कागदपत्रांद्वारे करण्यात आली असल्याने संबंधितांविरूद्ध पोलीसात तक्रार करू, अशी माहिती पांडे महालात आयोजित पत्रपरिषदेत पांडे महाल बचाव कृती समितीने दिली.
६६ हजार चौरस फुट क्षेत्रफळात असलेल्या पांडे महालाच्या १/३ क्षेत्राची विक्री करण्यात आली. पांडे महाला ऐतिहासीक वारसा असून येथील गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. याठिकाणी सात दिवस गणेशोत्सव थाटात साजरा केला जात होता.
नगर परिषदेने महालाबाबत दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्रात महाल ७० वर्षे जुने असल्याचे नमूद केले आहे. वास्तविक हे महाल १५० वर्ष जुने असल्याची नोंद आहे. नाहरकत प्रमाणपत्रावर मुख्याधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीऐवजी अन्य कर्मचाऱ्याची स्वाक्षरी आहे. हे महाल तीन हिस्स्यांमध्ये विभागले आहे. महालाची विक्र ी करताना पांडे यांच्या सर्व वारसांची संमती व स्वाक्षरी असणे आवश्यक होती. परंतु, तसे करण्यात आले नाही. शासन निर्णयानुसार, १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी वास्तू, कास्ट कला व ऐतिहासीक भवन अशा इमारतींची कोणत्याही प्रकारे खरेदी, विक्र ी तथा त्यामध्ये परिवर्तन करता येऊ शकत नाही. त्यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. परंतु, महालाच्या खरेदी विक्र ीत पुरातत्व विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. या महालाच्या खरेदी विक्री प्रकरणात संबंधितांविरुद्ध पोलीसात तक्रार करू, असे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी पांडे परिवारातील उमेश ईश्वरीप्रसाद पांडे, अक्षय योगेश पांडे, अॅड. शशीर वंजारी, विजय खंडेरा, शीतल तिवारी, सूर्यकांत इलमे, डॉ.नितीन तुरसकर, शैलेंद्र श्रीवास्तव, मौसमसिंग ठाकूर, संजय मते, नितीन कुथे, विकास मदनकर, जतिन शाहा, लोकेश रंगारी उपस्थित होते.
बनावट पत्रांचा आधार
सन २०११ मध्ये पांडे महालाची नोंद पुरातन वास्तू म्हणून करण्यात आली होती. काही वर्षानंतर पुरातन वास्तूचा दर्जा काढण्यासाठी पुरातन विभागाकडे अनेकांनी आक्षेप नोंदविले. आक्षेप नोंदविणाऱ्यांमध्ये आजी-माजी नगरसेवकांचा समावेश होता. परंतु, हे सर्व आक्षेप बनावट होते, हे नंतर स्पष्ट झाले. आ. अवसरे यांनी आक्षेप अर्जावरील सही आपली नसल्याचे सांगितले. एकाच व्यक्तीने अनेकांची बनावट स्वाक्षरी करून आक्षेप नोंदविले आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून महालाचे जतन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.