राज्यमार्गावरील वृक्षांची कत्तल थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:57 AM2019-04-20T00:57:53+5:302019-04-20T01:04:21+5:30
आंतरराज्यीय रस्त्यासाठी पवनी ते भंडारा रोडवरील अड्याळपर्यंत अनेक वृक्षांना कापण्यात आले आहेत. यात या मार्गावर स्थित पहेला ते बोरगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही कडेला भव्य, इंग्रजकालीन १०० वर्ष जुने, डौलदार, कडूनिंबांची मोठ मोठी आसपास वृक्ष आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आंतरराज्यीय रस्त्यासाठी पवनी ते भंडारा रोडवरील अड्याळपर्यंत अनेक वृक्षांना कापण्यात आले आहेत. यात या मार्गावर स्थित पहेला ते बोरगाव दरम्यान रस्त्याच्या दोन्ही कडेला भव्य, इंग्रजकालीन १०० वर्ष जुने, डौलदार, कडूनिंबांची मोठ मोठी आसपास वृक्ष आहेत. इथून जाताना उष्ण व ग्रीष्म ऋतुमध्ये थंड व शितलतेचा अनुभव होतो. सदर वृक्ष कापण्यात येऊ नयेत, अशी मागणी ग्रीन हेरीटेज संस्था भंडाराने केली आहे.
भव्य, मौल्यवान, पर्यावरण पोषक व अनेक जातीच्या पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या या झाडांना कापले गेले तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे पक्ष्यांचे नुकसान होणार आहे. विकास कामे व्हावे, अशी सर्वांची इच्छा आहे. पण याकरिता पर्यारणाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होता कामा नये, याची ही खबरदारी घेण्यात यावी.
शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी सातत्याने दुर्लक्ष होत असून आहे त्या वृक्षांची खुलेआम कत्तल सुरू असताना प्रशासन डोळे झाकून गप्प आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानाचा विपरीत परिणाम वन्यजीवांवरती होत असून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
अनेक निसर्गप्रेमी मानवतावादी पक्षीप्रेमी यांच्या मदतीने पशु, पक्षांच्या संवर्धनासाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात असले तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. यासाठी परिसरातील जीर्ण झाडांची होणारी तोड थांबविली जावी, यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
विकास कामासाठी झाडे तोडणे हा एकच पर्याय नसून त्या झाडांची पुर्नर लागवड शक्य असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचेही निसर्गप्रेमींनी सांगितले. बोरगाव ते पहेला दरम्यान या भव्य, सावलीदार कडूनिंबाच्या वृक्षांची कत्तल होवू नये याबाबद नुकतेच पत्र ग्रीनहेरिटेज पर्यावरण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक भंडारा यांना देण्यात आले.
वृक्षतोडीला प्रोत्साहन
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून या कामासाठी रस्त्याच्या दुतर्फा असणारे जीर्ण वृक्ष तोडले जात आहे. दरवर्षीच होणारे वृक्षारोपणाची अवस्था नेमेची येतो पावसाळा अशी झाली आहे. यासाठी प्रशासनाने वृक्षपुर्न लागवडीची प्रक्रिया राबवून वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांचाही पुढाकार आवश्यक आहे.