धान खरेदी केंद्रासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:11+5:30

तालुक्यातील सालेभाटा येथे असलेले धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. ते केंद्र त्वरीत सुरू करण्यासाठी सालेभाटा येथील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

Stop the villagers' path to the Paddy Shopping Center | धान खरेदी केंद्रासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

धान खरेदी केंद्रासाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको

googlenewsNext
ठळक मुद्देसालेभाटा येथे दोन तास वाहतूक ठप्प : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : दोन महिन्यांपासून सालेभाटा येथील बंद असलेले धान खरेदी केंद्र त्वरीत सुरू करण्यात यावे या मागणीला घेऊन श्री छत्रपती शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प पडली. टायर जाळून संतापही व्यक्त करण्यात आला.
तालुक्यातील सालेभाटा येथे असलेले धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. ते केंद्र त्वरीत सुरू करण्यासाठी सालेभाटा येथील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
रस्ता रोखून धरल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारी १ वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार दोनोडे यांनी भेट दिली. परंतु काहीही तोडगा निघालेला नाही.
आंदोलनकर्ते शेतकरी दुपारी ४ वाजतापासून राज्य महामार्गावर जावून बसले. रस्त्यावर टायर जाळण्यात आले. आंदोलन उग्र होत असल्यामुळे पोलिसांची कुमक बोलविण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी बन्सोड यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र यावेळीही कुठलाही तोडगा निघाला नाही.
शेवटी तहसीलदार मल्लीक विराणी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी खरेदी-विक्री सहकारी समितीचे सभापती घनश्याम खेडीकर यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याचे सांगितले. बारदाना अभावी धान खरेदी थांबलेली होती.
यावेळी जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी बोलून तात्काळ स्वरूपात पाच हजार बारदाना मागविण्यात आला. यात सुरूवातीला अडीच हजार बारदाणाचा पुरवठा करण्यात येणार आहे. सरतेशेवटी तहसीलदाराच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याअंतर्गत लाखनी तालुक्यातील सालेभाटा केंद्रांतर्गत सालेभाटा येथे दोन काटे तर राजेगाव व गोंडसावरी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले, सुरेश बोपचे, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, प्रदीप रहांगडाले, संजय रहांगडाले, सुधाकर हटवार, भाष्कर जांभूळकर, दिगांबर जांभूळकर, मंगेश वाघमारे, हेमराज पटले व अन्य उपस्थित होते.

Web Title: Stop the villagers' path to the Paddy Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.