कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून दस्तलिखाणाचे काम बंद करा
By Admin | Published: October 28, 2016 12:34 AM2016-10-28T00:34:03+5:302016-10-28T00:34:03+5:30
दुय्यम निबंधक कार्यालय मोहाडी येथे कंत्राटी तत्त्वावर डाटा आॅपरेटर विना परवाना दस्तलेखकाचे कामे करतात.
मागणी : कंत्राटी तत्त्वावर डाटा आॅपरेटरची विना परवाना नियुक्ती
मोहाडी : दुय्यम निबंधक कार्यालय मोहाडी येथे कंत्राटी तत्त्वावर डाटा आॅपरेटर विना परवाना दस्तलेखकाचे कामे करतात. डाटा आॅपरेटर करीत असलेले दस्तलेखकाचे काम त्वरीत बंद करण्यात यावे, अशी मागणी मोहाडी येथील परवाना प्राप्त दस्तलेखक अशोक निमजे, यशवंत चव्हाण, प्रणय सोनकुसरे यांनी दुय्यम निबंधक व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे.
दुय्यम निबंधक कार्यालय येथे कंत्राटी डाटा आॅपरेटर हे ग्रामीण भागातील व्यक्ती विक्रीपत्र, बक्षिसपत्र, गहाणपत्र, हक्क सोडपत्र इत्यादी कामासाठी कार्यालयात आले तर तेथे उपस्थित कंत्राटी आॅपरेटर त्या पक्षकारांची दिशाभूल करून शासकीय कॉम्प्युटरवरच चालान भरणे, डाटा एंट्री व रजिस्ट्री टंकलिखीत करून देतात. त्यामुळे शासाच्या कॉम्प्युटरचा दुरुपयोग होतो.
शासकीय नियमानुसार या आॅपरेटर्सना शासकीय कामांचाच अधिकार असताना ते गैरकायदेशिरपणे दस्तऐवज करून देतात. त्यामुळे परवानाधारक दस्तऐवज लेखकांचा नुकसान होऊन अन्याय होत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील कंत्राटी दस्तऐवज तयार करीत असल्याचे पाहून तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेले झेरॉक्सवालेसुद्धा गैरकायदेशिरपणे दस्त लिखाणाचे काम करीत आहेत. यांच्यावर त्वरीत कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी अशोक निमजे, यशवंत चव्हाण, प्रणय सोनकुसरे, प्राप्त दस्तऐवज लेखकांनी दुय्यम निबंधक, सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नोंदणी उपमहानिरीक्षक नागपूर, नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रण पुणे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. (शहर प्रतिनिधी)
दुय्यम निबंधक कार्यालयात कोणीही दस्तलेखकाचे कामे करीत नाही. त्यांच्या जवळ तेवढा वेळ नसतो. सारथी नियमानुसार कोणताही सुशिक्षित किंवा अनुभवी व्यक्त दस्तऐवज लिहू शकतो.
- के.आर. मुजुमदार
दुय्यम निबंधक, मोहाडी