नियुक्तीसाठी कामगारांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:46 PM2017-11-28T23:46:19+5:302017-11-28T23:47:15+5:30
तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : तालुक्यातील मारेगाव येथे स्थित महाराष्ट्र मेटल पावडर या कारखान्यात १० कंत्राटी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याच्या कारणावरून २०० च्या जवळपास कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सदर कामगारांना परत घेण्याच्या मुद्यावर त्या कामगारांनी कंपनीसमोरच ठिय्या मांडला.
तालुक्यातील मारेगाव येथे शहापूर नजीक ही कंपनी असून यात ४५० पेक्षा कामगार कार्यरत आहेत. यात १५० च्या जवळपास स्थायी कामगार असून अन्य कामगार कंत्राटदारांच्या अंतर्गत कंत्राटी स्वरुपात कार्य करतात. मंगळवारी विना सूचना १० कंत्राटी कर्मचाºयांना कामावर घेण्यास नकार देण्यात आला.
हे सर्व कामगार ५ ते ७ वर्षांपासून येथे काम करीत आहेत. कसलीही पूर्व सूचना न देता व कारण न सांगता कामगारांना कामावरून का कमी केले असा प्रश्न उपस्थित करून अन्य कंत्राटी कामगारांनी सदर कर्मचाºयांना कामावर घेण्याच्या मागणीसाठी कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले.
सर्व कंत्राटी कामगारांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बोनसची मागणी केली होती. त्या संबंधाने सहाय्यक कामगार आयुक्तांनाही मागणीचे निवेदन दिले होते. बोनस अजूनपर्यंत कर्मचाºयांना मिळाले नाही. त्यामुळेच सुडबुद्धीने या कामगारांना काढण्यात आले काय? असा सवालही कंत्राटी कामगारांनी उपस्थित केला आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीला घेऊन कंपनीतील अन्य कंत्राटी कामगारांनीही कंपनीसमोरच आंदोलन सुरु केले आहे. या कामगारांना धोका उत्पन्न झाल्यास याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाची राहील असेही या कामगारांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे. सदर आंदोलनाला आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) यांनीही पाठींबा दिला आहे. सदर मागणीचे निवेदन कंपनीच्या व्यवस्थापकांसह जिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त व उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
आयटकचे कार्याध्यक्ष हिवराज उके, दयानाथ चव्हाण, हिरालाल चरडे, अशोक बाभरे, गोवर्धन मते, जितेंद्र राऊत, राजू शेंडे, नागेश्वर मेश्राम, अमर बागडे, संजय वासनिक, जितेंद्र शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिसाद मिळेना
यासंदर्भात एमएमपीआयएलचे महाव्यवस्थापक मिलिंद खेर यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर ‘लोकमत’ प्रतिनधीने संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला खरा पण प्रश्न विचारण्यापूर्वीच फोन कट केला.