काम बंद, त्रास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:54 PM2018-11-23T21:54:16+5:302018-11-23T21:54:53+5:30
शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम आठवडाभरापासून ठप्प झाल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्णत: खोदल्याने या मार्गावर वाहतुकीची कायम कोंडी होत असून धुळीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर या खोदकामामुळे अपघात होण्याची भीती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरातील जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम आठवडाभरापासून ठप्प झाल्याने वाहतुकीस अडथडा निर्माण झाला आहे. रस्त्याची एक बाजू पूर्णत: खोदल्याने या मार्गावर वाहतुकीची कायम कोंडी होत असून धुळीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर या खोदकामामुळे अपघात होण्याची भीती आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिनस्त राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४७ ला जोडणाऱ्या भंडारा-सावनेर मार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. गुजरात येथील एचजी इन्फ्रा कंपनीद्वारे रस्त्याचे काम केले जात आहे. त्याअंतर्गत १५ दिवसापुर्वी शहरातील जिल्हा परिषद चौकापासून रस्त्याच्या एका बाजुच्या खोदकामाला सुरू झाली. मशीनच्या सहायाने रस्ता खोदून काम सुरू करण्यात आले होते. मात्र नगरपरिषदेने नाहरकत प्रमाणपत्रावरून आक्षेप घेतल्याने गत गुरूवारी काम बंद करण्यात आले. हा रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा असून राष्ट्रीय महामार्गावरून तुमसर शहराकडे शहरातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. दिवसभर या मार्गावर वाहतूक सुरू असते. तसेच शहराच्या विविध भागातून बाजारात जाण्यासाठी नागरिकही याच रस्त्याचा उपयोग करतात. तसेच शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कार्यालयातील कर्मचारीही याच मार्गाने जातात. त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते. गत आठवडाभरापासून हा रस्ता एकाबाजुने खोदून ठेवल्याने संपूर्ण भार एका बाजुवर आला आहे. त्यातच रस्त्याच्या बाजुला असलेल्या अनेक दुकानासमोरही वाहने उभी केली जातात. त्यामुळे हा रस्ता अरूंद होवून वाहतुकीची कोंडी होती. वाहतूक पोलिसांचे वाहन या रस्त्यावरून सुचना देत जात असले तरी त्यावर उपाय कोणताही केला जात नाही. रस्त्यावरून उडणाºया धुळीमुळे परिसरातील रहिवासी कमालीचे त्रस्त झाले आहे. त्याचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे.
नगरपरिषदेच्या परवानगीशिवाय काम
जिल्हा परिषद चौक ते केशवनगर या रस्त्याचे रूंदीकरण नगरपरिषदेच्या नाहरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू करण्यात आले. या संदर्भात नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी एचजी इन्फ्रा कंपनीसह जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना पत्र दिले. त्यापत्रानुसार भंडारा नगरपरिषदेच्या हद्दीत सुरू असलेले रस्त्याचे रूंदीकरण नगरपरिषदेकडून कुठल्याही प्रकारचे नाहरकत प्रमाणप न घेता सुरू केले. भंडारा शहरासाठी शासनासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. शहरात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू होत आहे. या कामाच्या संबंधाने वारंवार चर्चा केल्यानंतरही एचजी इन्फ्रा कंपनी प्रतिसाद देत नाही. तसेच नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने अडचणी निर्माण होवू नये म्हणून अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने व समन्वयाचे दृष्टीने नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांसोबत तात्काळ बैठक घ्यावी त्यानंतरच कामाला सुरूवात करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
अंतर्गत वादाने काम बंद पडल्याचा आरोप
जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौक या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग आणि नगरपालिका यांच्या अंतर्गत वादामुळे बंद पडल्याचा आरोप भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने एका निवेदनातून करण्यात आला आहे. या रस्त्याचे बांधकाम थांबल्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत सुरू करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या रस्त्यावरून आता नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. अपघाताची भीतीही निर्माण झाली आहे. त्यासाठी काम तात्काळ सुरू करणे गरजेचे असल्याने या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे म्हणाले, ५०० मीटर खोदकाम झाल्यानंतर नगरपरिषदेला जाग आली. जेव्हा कामाला प्रारंभ झाला तेव्हाच काम थांबवायला हवे होते. परंतु आता खोदकामानंतर काम थांबविल्याने अपघाताची भीती वाढली असून याला नगरपरिषदच जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले.