दस्तावेजांसाठी ‘स्टोअर रुम’चे काम सुरु
By admin | Published: December 27, 2014 10:45 PM2014-12-27T22:45:36+5:302014-12-27T22:45:36+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही, या आशयाचे खळबळजनक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित
देवानंद नंदेश्वर - भंडारा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्त्वपूर्ण दस्तावेज अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही, या आशयाचे खळबळजनक वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच शनिवारी सुटीच्या दिवशी दस्तावेजांसाठी 'स्टोअर रुम'चे काम सुरु करण्यात आले आहे. कामाच्या देखरेखीसाठी दिवसभर कक्ष अधिकारी के. आर. खोब्रागडे तळ ठोकून होते.
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महत्त्वपूर्ण दस्तावेज दि.२२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आणण्यात आले होते. हे दस्तावेज जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या आवारात ठेवण्यात आले. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारा शेजारी वाहनांमार्फत आणण्यात आले. येथे मजुरांनी दस्तावेज अस्तव्यस्त पध्दतीने ठेवून दिले आहे. दस्तावेजांचे गठ्ठे विखुरलेले असताना तेथील बहुतांश कागदपत्रे फाटले तर काही चुरडलेले आहे.
व्हरांड्यात दस्तावेजांचा ढीग लावलेला आहे. शेजारीच जिल्हा परिषदेला वीज पुरवठा करणारे संयत्र आहे. स्पार्किंग झाल्यास महत्त्वपूर्ण दस्तावेज जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चौथा शनिवार असल्यामुळे आज जिल्हा परिषदेला सुटी होती. तरीही 'लोकमत'च्या वृत्ताची दखल घेत आरोग्य विभागाने कर्मचाऱ्यांच्या कक्षात दस्तावेजांसाठी 'स्टोअर रुम'च्या कामाला झपाट्याने प्रारंभ केला. या कामावर तीन मजूर उपस्थित होते. सकाळपासून कामाच्या देखरेखीसाठी कक्ष अधिकारी खोब्रागडे तळ ठोकून होते.
व्हरांड्यात असलेले विखुरलेले गठ्ठे जैसे थे आहेत. यातील काही गठ्ठे मजुरांनी उचलून कर्मचाऱ्यांच्या टेबलाखाली ठेवले आहेत. सोमवारपर्यत 'स्टोअर रुम'चे काम पुर्ण करावयाचे आदेश अधिकाऱ्यांचे असल्यामुळे शनिवार व रविवारी या दोन दिवसात मजुरांच्या माध्यमातून युध्दपातळीवर काम सुरु आहे.