ढोलसर गावात वादळाचा कहर
By admin | Published: June 3, 2015 12:40 AM2015-06-03T00:40:22+5:302015-06-03T00:40:22+5:30
१ जूनच्या रात्री १२ च्या सुमारास वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले....
विरली (बु.) : १ जूनच्या रात्री १२ च्या सुमारास वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळच्या ढोलसर या गावाला या वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. येथील अनेक घरांचे छत, कवेलू आणि टिनपत्रे उडाल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी पावसासह झालेल्या गारपिटीने उन्हाळी धान आणि ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
रात्री अचानक मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह झालेल्या गारपीट आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. ढोलसर येथील अनेक घरांवरील छत, कवेलू आणि टिनपत्रे उडाली. गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे पडल्याने जनावरे जखमी झाली. मात्र सदैवाने गावात कुठेही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही. वादळाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडली. त्याचप्रमाणे विजेचे खांबही कोसळले. त्यामुळे येथील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. वादळी पावसाच्या तडाख्याने उन्हाळी धान आणि ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच कर्जात बुडालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)
नुकसानीच्या पंचनाम्याची फाईल गहाळ?
मागील वर्षी १० जून रोजी आलेल्या वादळाने या परिसरातील २०-२५ गावांना तडाखा बसला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र त्याची भरपाई अजूनपर्यंत मिळाली नाही. त्यावेळी झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची फाईल गहाळ झाल्याची कुजबूज आहे. त्यामुळे महसूल विभाग शेतकऱ्यांच्या नुकसानीविषयी किती जागृत आहे याची कल्पना यावी. मात्र येथील जनप्रतिनिधी याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे नुकत्याच झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार की नाही ? याविषयी गावकरी साशंक आहेत.