व्हायरल व्हिडीओवरून उठलेले वादळ पुन्हा त्याच व्हिडीओकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:00 AM2022-01-06T05:00:00+5:302022-01-06T05:00:25+5:30
३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतीच कारवाई झाली नाही. या एकतर्फी कारवाईने आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
तथागत मेश्राम
लोकमत न्यूज नेटवर्क
वरठी : आमदार राजू कारेमोरे यांनी वापरलेली भाषा समर्थनीय नाहीच. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईहीही झाली. मात्र पोलीस ठाण्यात गोंधळ घालतानाचा व्हिडीओ पुन्हा तपासून पाहण्याची वेळ आली आहे. जबाबदार अधिकारी ठाणेदाराचे अशोभनीय वर्तन या व्हिडीओत दिसत आहे. फिर्यादीला विचारपूस करण्याऐवजी त्यांच्या अंगावर ठाणेदार धावून जाताना दिसतात. मात्र कारवाई एकतर्फी करण्यात आली. त्यामुळे मोहाडी ठाण्यातील व्हायरल व्हिडीओवरून उठलेले वादळ पुन्हा त्याच व्हिडीओकडे वळत आहे.
३१ डिसेंबरच्या रात्री राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाडी ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. अश्लील शिवीगाळ केली. त्याचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी आमदार राजू कारेमोरे यांना अटक केली. एक रात्र भंडारा कारागृहात काढावी लागली. व्यापाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात व्यापाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतीच कारवाई झाली नाही. या एकतर्फी कारवाईने आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. आमदारांनी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे.
आमदारांच्या शिवीगाळीचा व्हायरल व्हिडीओ पुन्हा एकदा तपासून पाहणे गरजेचे आहे. हा व्हिडीओ नेमका कुणी तयार केला याचाही शोध घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या व्हिडीओत शिवीगाळ सुरू असताना ठाणेदारांची झालेली एन्ट्री आगीत तेल ओतण्यासारखी ठरली. जबाबदार अधिकाऱ्यांचे कृत्य अशोभनीय दिसते. शिव्यांची लाखोली सुरू असताना आमदारांना विचारपूस न करता फिर्यादीच्या अंगावर धावून जाताना ठाणेदार दिसतात. आमदारांच्या शिवीगाळीचे समर्थन नाही परंतु कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांचा हा बेजबाबदारपणाही तेवढाच महत्त्वाचा आहे. आता या व्हिडीओची तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. त्यासाठी न्यायालयीन मार्ग शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
तक्रार दाखल करण्यास दिरंगाई
- मारहाण झालेल्या दोन व्यापाऱ्यांची तक्रार दाखल करून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे मित्रांसाठी आमदार कारेमोरे यांची ठाण्यात एन्ट्री झाली. आमदार ठाण्यात गेल्यावर त्यांची विचारपूस करण्याचे साधे सोपस्कारही अधिकाऱ्यांकडुन याठिकाणी झाले नाही.