वादळी वातावरणाची शेतकऱ्यात धडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:00 PM2019-04-16T23:00:27+5:302019-04-16T23:00:51+5:30
गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळच्या वेळी वादळी वातावरण तयार होते. सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची सर कोसळते. या वादळामुळे आंबा, गहू, धान पिकांसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान होत आहे. तर वादळानंतर रात्रभर वीज पुरवठा खंडित होतो. या वादळी वातावरणाची शेतकऱ्यात चांगलीच धडकी भरली आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात वादळी वाºयासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. गत तीन दिवसांपासून सायंकाळ झाली की, अचानक वादळी वातावरण सुरु होते. सोसाट्याचा वारा वाहू लागतो. भंडारा शहरात या वादळामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडतात. दुचाकी चालकांची मोठी धांदल उडते. अनेक जण डोळ्यात कचरा गेल्याने दुचाकीवरून पडल्याच्या घटना घडत आहेत. भंडारा शहरासोबतच जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वातावरणाचा फटका बसत आहे.
सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यासह लाखांदूर, लाखनी, साकोली, मोहाडी तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला. रात्री भंडारा तालुक्यातील मुजबी, जवाहरनगर, सावरी, खात रोड परिसर, टवेपार आदी ठिकाणी पावसाची सर कोसळली.
या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसत आहे. यंदा आंबे लदबदून लागले आहेत. गावरानी आंब्याची यंदा नव्हाळी होणार असे असताना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या वादळी वातावरणाने झाडावरील आंबे गळून पडत आहेत. या सोबतच गहू आणि उन्हाळी धानपिकालाही फटका बसत आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर कोपल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात अपुरा पाऊस झाल्याने धानपिकाला फटका बसला. त्यानंतर गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा पिकांना बसला. आता पुन्हा वादळी वातावरण झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
पालांदूर परिसरात तीन तास सोसाट्याचा वारा
पालांदूर : लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाºयाने जनजीवन विस्कळीत केले. तब्बल तीन तास वारा घोंघावत होता. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. वीज पुरवठाही बंद झाला. काही ठिकाणी वीज खांब झाडावर पडल्याने रात्रभर वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. चुलबंद खोºयातील मºहेगाव, नरव्हा आदी गावात उन्हाळी धानपीक सुकले आहे. मात्र पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. अनेक ठिकाणी वीज तारा लोंबकळत असल्याचे दृष्य आहे.
वातावरणात गारवा
गत तीन दिवसांपासून वादळी वातावरणामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे नागरिकांची कडक उन्हापासून सुटका झाली. तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत होते. सायंकाळच्या वेळी मात्र असह्य उकाड्याला प्रारंभ झाला.