पहिल्या दिवशी खरेदीसाठी तुफान गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:34+5:302021-06-02T04:26:34+5:30
भंडारा : गत दीड महिन्यापासून बंद असलेली बाजारपेठ मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडली आणि ग्राहकांची एकच गर्दी झाली. शहरातील ...
भंडारा : गत दीड महिन्यापासून बंद असलेली बाजारपेठ मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडली आणि ग्राहकांची एकच गर्दी झाली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहनांची, तर दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत होती. कोरोना संसर्ग कमी झाल्याने नागरिक दिवसभर रस्त्यांवर गर्दी करून असल्याचे चित्र मंगळवारी शहरात होते.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला होता. मात्र, आता कोरोना संसर्ग कमी होऊ लागला. जिल्ह्यात कोरोना पाॅझिटिव्हिटी दर ७.७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक दी चेन’मध्ये अंशत: सवलत दिली. जिल्ह्यातील अत्यावश्यक आणि इतर दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली. मंगळवारी पहिल्या दिवशी सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक रस्त्यावर दिसत होते. दीड महिन्यानंतर दुकान उघडण्यासाठी व्यापारीही उत्सुक झाले होते. सकाळी ९ वाजेनंतर ग्राहकांची मोठी गर्दी दुकानांमध्ये दिसून आली. कापड, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स यासह विविध दुकानांमध्ये ग्राहक दिसत होते. कापड दुकानात तर सकाळी ८ वाजेपासूनच ग्राहकांची गर्दी झाली होती. भंडारा शहरातील मेन लाइन, मोठा बाजार परिसरात दुकाने उघडल्याने उत्साहाचे वातावरण दिसत होते. ग्राहक मोठ्या संख्येने खरेदी करीत होते. आतापर्यंत ओस पडलेल्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून आली. खरेदीचा उत्साह एवढा मोठा होता की, कुणालाही कोरोना संसर्गाच्या नियमांचे पालन करण्याचे भान दिसले नाही. मास्क लावलेला असला तरी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे सर्वत्र चित्र होते.
व्यापाऱ्यांमध्ये उत्साह
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत दीड महिन्यापासून बंद असलेली दुकाने उघडण्यासाठी व्यापाऱ्यांमध्येही उत्साह दिसून येत होता. कापड, सराफा, भांडी, जनरल स्टोअर्स यासह विविध दुकाने सकाळी ७ वाजता उघडून ग्राहकांची प्रतीक्षा करीत होते. ग्राहकही तब्बल दीड महिन्यानंतर बाजाराचा फेरफटका मारताना दिसून येत होते. जिल्हा प्रशासनाने वेळ वाढवून दिली असली तरी दुपारी २ वाजेनंतरही अनेक जण रस्त्यावर भटकंती करताना दिसत होते. मेन लाइनसह शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. मात्र, नागरिकांच्या उत्साहापुढे तेही हतबल होते.