सरपंचांच्या उपोषणाचा सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:47 PM2018-11-23T21:47:36+5:302018-11-23T21:52:43+5:30
झरी उपसा सिंचनात ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसह विविध मागण्यासाठी गत तीन दिवसांपासून मुर्झा येथे परिसरातील सरपंचांनी सुरू केलेल्या उपोषणाची गुरूवारी सायंकाळी सांगता झाली. पाठबंधारे विभाग व ईटियाडोह प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. खासदार मधुकर कुकडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : झरी उपसा सिंचनात ईटियाडोह प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या मागणीसह विविध मागण्यासाठी गत तीन दिवसांपासून मुर्झा येथे परिसरातील सरपंचांनी सुरू केलेल्या उपोषणाची गुरूवारी सायंकाळी सांगता झाली. पाठबंधारे विभाग व ईटियाडोह प्रकल्प अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. खासदार मधुकर कुकडे यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला साक्षी ठेवून ११ गावच्या सरपंचांनी मुर्झा येथे २१ नोव्हेंबरपासून उपोषणाला प्रारंभ केला होता. या आंदोलनाचे नेतृत्व पारडी येथील मानबिंदू दहिवले करीत होते. ईटियाडोह धरणाचे पाणी झरी उपसा सिंचनमध्ये सोडावे, बेरोजगारांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे यासाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. तीन दिवसानंतर गुरूवारी खासदार मधुकर कुकडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बांते, कार्यकारी अभियंता छप्परधरे, तहसीलदार महाले, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, अविनाश ब्राम्हणकर, कनिष्ठ अभियंता भिवगडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. खासदार कुकडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना आदेश देवून ताबडतोब कामे पूर्ण करण्यास सांगितले. त्यावरून उपोषणकर्त्यांचे समाधान झाले. खासदार कुकडे यांनी निंबूपाणी देवून उपोषण सोडविले.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे मानबिंदू दहिवले म्हणाले, आमच्या समस्या निकाली काढण्याचे आश्वासन खासदार कुकडे यांनी दिले. त्यामुळेच आम्ही उपोषण मागे घेतले आहे. 'लोकमत'नेही सातत्याने पाठपुरावा केल्याचे त्यांची सांगितले.