अजब कारभार ! मागितले दहा लाख, दिले तीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:31+5:302021-04-16T04:35:31+5:30
भंडारा जिल्ह्यात ६ तालुक्यात एकूण १२ शाळांत विना अनुदानित तत्त्वावर घड्याळी तासिका शिक्षकांना नेमण्यात आले आहे. या शाळांमध्ये भंडारा ...
भंडारा जिल्ह्यात ६ तालुक्यात एकूण १२ शाळांत विना अनुदानित तत्त्वावर घड्याळी तासिका शिक्षकांना नेमण्यात आले आहे. या शाळांमध्ये भंडारा तालुक्यात २, लाखनी तालुक्यात २, मोहाडी तालुक्यात ४, तुमसर तालुक्यात १, लाखांदुर तालुक्यात २ व पवनी तालुक्यातील १ अशा जिल्ह्यातील १२ विना अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वर्गांना शिक्षणाचे धडे दिले जात आहे.
जिल्ह्यातील पात्र बेरोजगार युवकांना या विना अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वर्गांना शिकविण्यासाठी नियुक्त करण्यात आले. या नियुक्ती अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२० - २१ मध्ये घड्याळी तासिका शिक्षकांना मानधनासाठी शिक्षण विभागाला ९ लाख ५८ हजार रुपयांची मागणी केली; मात्र शिक्षण विभागाने केवळ २ लाख ९० हजार रुपयांचे मानधन मंजूर केल्याने घड्याळी तासिका शिक्षकांत संतापाचे वातावरण आहे.
गतवर्षी कोरोना संकटाच्या काळात राज्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालये बंद होती. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याहेतूने शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार ऑनलाइन शिक्षणाचे धडे देण्यात आले होते. ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरविण्याचे काम हे जिल्हाभरातील घड्याळी तासिका शिक्षकांनीदेखील केले; मात्र शिक्षण विभागाने मागणी केलेल्या मानधनाच्या निम्म्याहून कमी मानधन मंजूर केले आहे. शासन, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन जिल्हाभरातील विना अनुदानित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या वर्गांना शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या घड्याळी तासिका शिक्षकांना मानधन तत्काळ द्यावे, अशी मागणी आहे.
बॉक्स
जिल्हा परिषदेची मदार घड्याळी तासिका शिक्षकांवर
शिक्षणाचा मूलभूत हक्क सांगत मोफत शिक्षण सक्तीचे शिक्षण, कोणी विद्यार्थी शाळाबाह्य अथवा शिक्षणापासून वंचित राहू नये, असा शासन नियम आहे. पुरेशा पटसंख्येअभावी काही शाळा मोडकळीस आलेल्या असताना काही शाळेत कायम शिक्षक नसल्याने शिक्षण विभागाचा अजब कारभार सुरू आहे. अशा शाळांची मदार या शिक्षकांवर आहे.
बॉक्स :
अत्यल्प मानधन, ते देखील नियमित नाही
अध्यापनाचे कार्य करताना शासनाकडून माध्यमिक तासिका अध्यापकांना प्रती तास ४८ रुपये तर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना प्रती तास ७२ रुपये दिले जात आहे. मानधन अत्यल्प असून, ते देखील नियमित दिले जात नाही. अशा बिकट प्रसंगात आता घड्याळी तासिका शिक्षक ज्ञानदान करीत आहेत.