मोहाडी येथील पथदिवे चार दिवसापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:37 AM2021-07-27T04:37:04+5:302021-07-27T04:37:04+5:30
नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष मोहाडी : येथील प्रभाग क्रमांक एक मधील रस्त्यावरील संपूर्ण पथदिवे मागील चार दिवसापासून बंद असल्याने रस्त्यावर ...
नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष
मोहाडी : येथील प्रभाग क्रमांक एक मधील रस्त्यावरील संपूर्ण पथदिवे मागील चार दिवसापासून बंद असल्याने रस्त्यावर रात्री काळाकुट्ट अंधार असतो. याची वारंवार सूचना देऊन सुद्धा पथदिवे सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.
मोहाडी नगर पंचायतीचा कार्यकाळ संपल्यामुळे येथे सध्या प्रशासक नियुक्त आहेत. लोकनियुक्त सदस्य नसल्याने नगरपंचायतीचा संपूर्ण कारभार आलबेल पद्धतीने सुरू आहे. प्रभाग एक हा शेतीच्या जवळ लागून असल्याने आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू, विषारी कीटक या प्रभागाच्या रस्त्यावर अधिक प्रमाणात निघतात. येथील रस्ते, नाल्या अजून पर्यंत कच्च्याच आहेत. पक्के रस्त्यांचे नाव नाही. येथील नागरिकांना पावसाळ्यात चिखलमय रस्त्यावरून कपडे खराब करीत जावे लागते. अशात रात्री पथदिवे बंद असले तर रस्त्यावरून चालत जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. नगर पंचायतीला वारंवार सूचना देऊनही या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने प्रभागातील नागरिक त्रस्त असून रोष व्याप्त आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यानीं याकडे जातीने लक्ष घालावे अशी या प्रभागातील जनतेची मागणी आहे.
मुख्याधिकारी लाखनीला
मोहाडी नगर पंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना लाखनी नगर पंचायतीचा प्रभार देण्यात आला असल्याने व त्यांच्याशी भेटण्यास गेलेल्यांना ते लाखनीला गेले असल्याचे मोहाडी नगर पंचायतीकडून नेहमी सांगण्यात येत असते. येथील कर्मचारीही आता मुजोर झालेले असून ते नगर पंचायतीच्या आतील घटनाबाबत शहरातील पानटपऱ्यावर उलटसुलट चर्चा करताना आढळतात. मात्र त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. याकडेही लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.