महसूल विभागाच्या चौकीमुळे अपघाताला बळ
By admin | Published: January 23, 2017 12:18 AM2017-01-23T00:18:50+5:302017-01-23T00:18:50+5:30
पवनी निलज मार्गावरील बसस्थानकाशेजारील महसुल विभागाचे चौकीने प्रवासी, विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढविली आहे.
पवनीतील प्रकार : चौकी हटविण्याची मागणी
भंडारा : पवनी निलज मार्गावरील बसस्थानकाशेजारील महसुल विभागाचे चौकीने प्रवासी, विद्यार्थी यांची डोकेदुखी वाढविली आहे. चौकीवर रेती रॉयल्टी तपासणी होत असल्याने नेहमीच टिपरच्या रांगा पाहायला मिळतात. त्यामुळे रस्त्याच्या आवगमन करणाऱ्यांना प्रवाशांना अपघाताची शक्यता बळवली आहे. मोठा अपघात होण्याची वाट पाहण्या अगोदरच ती चौकी दुसरीकडे हटविण्याची मागणी होत आहे.
पवनी तालुक्यात चार रेती घाटाचे लिलाव झाले असून निलज-पवनी मार्गावर पवनी बसस्थानकाजवळ महसुल विभागाची रॉयल्टी तपासणी चौकी आहे. पूर्वी ही चौकी निलज फाट्यावर होती. ही चौकी बसस्थानकाच्या समोर असुन पवनी शहरात शाळा, कॉलेज शासकीय व निमशासकीय कार्यालये असुन या रस्त्याने तहसिल कार्यालय, बसस्थानक व शहरात जाणाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. बसस्थानकासमोर महसुल विभागाने दोन मोठे ब्रेकर तयार केल्याने या ब्रेकरमुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहेत. सदर चौकीत रेती रॉयल्टी तपासणी होत असल्याने येथे लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन दररोजचे लहान मोठे अपघात पाहायला मिळतात. चौकीला लागूनच देशी दारु व बारचे दुकान असल्याने येथे मद्यपीचे नेहमीच वर्दळ असते.
जुन्या बस्थानकावर प्रवाशांची गर्दी असल्याने प्रवाशी जुन्या बसस्थानकावर न थांबता बसमध्ये बसण्याची जागा मिळावी म्हणून नविन बसस्थानकावर जातात. त्यामुळे या मार्गावर तहसिल कार्यालय व नविन बसस्थानक असल्याने रस्त्याने नेहमीच वर्दळ असते. बसस्थानकाशेजारीच चौकी असल्याने कित्येकदा अपघात झाल्याचे उदाहरण आहेत. सदर चौकीत पोलीस विभागाचे दोन पोलीस तैनात असतात. मात्र त्यांना हे अपघात दिसत नाही काय?
यापूर्वी ही चौकी पेटविण्यात आली होती. चौकीच्या समोरच बार आहे. चौकीतील कर्मचारी बार मध्ये नेहमीच आढळतात. कर्मचारी दारुपीऊन डीवटी करत असल्यामुळे अनेक चालकासोबत विनाकरण अरेरावी करीत असतात. याकडे वरिष्ठ अधिकारी मात्र दुर्लक्ष करीत आहेत. ही चौकी हटविण्याकरिता अनेक पालकांनी वरिष्ठांनी तक्रारी करुनही वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत आहेत. एखाद्याच्या जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार काय? ही महसुल विभागाची चौकी जीवघेणी ठरत असून एखाद्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. ती चौकी तात्काळ हटविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
या चौकीमुळे या परिसरात एस.टी. बसला व प्रवाशांना अडथळा निर्माण होतो. चौकी हटविण्या संदर्भात येथील तहसिलदार यांना चौकी हटविण्याबाबद लेखी तोंडी तक्रार देवूनही कोणतीच कारवाही होत नसल्यामुळे ही चौकी दिवसेंदिवस त्रासदायक ठरत असून अपघाताला आमंत्रण देत आहे.
- गौतम शेंडे
आगार व्यवस्थापक पवनी