समाज घडविण्याची ताकद युवा पिढीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 10:34 PM2018-02-23T22:34:05+5:302018-02-23T22:34:05+5:30
समाज घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला चालना दिली पाहिजे व आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : समाज घडविण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे. युवकांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचाराला चालना दिली पाहिजे व आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर केला पाहिजे. युवकांनी मोठी स्वप्न बघावी व त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम व सातत्य ठेवावे. तरुणांनी कुठलीही गोष्ट स्विकारण्यापूर्वी त्यांचे शास्त्रीय विश्लेषण केले पाहिजे. युवा पिढीमध्ये जाज्वल देशाभिमान असला पाहिजे तरच ते जबाबदार नागरिक बनु शकतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्र भंडारातर्फे राष्ट्रीय सेवा योजना व जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा संमेलनाचे आयोजन जे.एम. पटेल सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे.एम. पटेल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. कार्तीक पाणीकर होते तर विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापिठ सिनेट सदस्य प्रविण उदापूरे, स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शक प्रा. अनिल महल्ले, नेहरु युवा केंद्र भंडाराचे जिल्हा युवा समन्वयक संजय माटे व राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. राजेंद्र शाह उपस्थित होते.
यावेळी नागपूर विद्यापिठ सिनेट सदस्य प्रविण उदापूरे यांनी विद्यार्थी युवकांच्या समस्या व त्या निवारण्याचे उपाय उपस्थित युवक युवतींसमोर मांडले. स्पर्धात्मक परिक्षेचे मार्गदर्शक प्रा. अनिल महल्ले युवकांना मार्गदर्शन करतांना म्हणाले, नोकरी मिळविण्यासाठी युवकांनी आपल्यातील कौशल्य विकसित केले पाहिजे. आपला आत्मविश्वास वृध्दिंगत करुन आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे.
प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका माडतांना संजय माटे म्हणाले की, युवकांच्या विकासाला गती देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांना राष्ट्रविकासाच्या मुख्य धारा प्रवाहात जोडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन आहे. या वर्षीचा उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहिर करण्यात आले असून हा पुरस्कार भंडारा डिस्ट्रिक्ट स्पोर्टस आश ते डु असोशिएशन पवनी यांना मिळाला. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये रोख व जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी प्रमाणपत्र असे आहे. हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आला.
संचालन गणेश खडसे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. राजेंद्र शाह यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहरु युवा केंद्राचे रमेश अहिरकर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रिना फुले, आकाश थानथराटे, शालु पिलारे, प्रिया रंगारी, सुर्यकांत मरघडे, शुभम मारबते यांनी सहकार्य केले.