धम्मक्रांती जपून धम्माचा पाया मजबूत करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2017 12:21 AM2017-02-14T00:21:03+5:302017-02-14T00:21:03+5:30
क्रांती आपोआप होत नाही. ती विचार, संघर्ष व आचरणाने होते. बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन, मनन व चिंतन करून आचरणातून धम्मक्रांती घडवून आणली आहे.
अमृत बन्सोड यांचे प्रतिपादन : बौद्ध पर्यटन स्थळ दशबल टेकडी हत्तीडोई येथील धम्म मेळावा
जवाहरनगर : क्रांती आपोआप होत नाही. ती विचार, संघर्ष व आचरणाने होते. बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वाचन, मनन व चिंतन करून आचरणातून धम्मक्रांती घडवून आणली आहे. तिचे मोल जपून आपण सर्वांनी धम्माचा पाया मजबूत करावा, असे प्रतिपादन साहित्यिक अमृत बन्सोड यांनी केले.
बौद्ध पर्यटनस्थळ दशबल पहाडी हत्तीडोई सीतेपार येथे दशबल पहाडी भिक्खू संघ, सीतेपारद्वारा आयोजित माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त आयोजित बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना व धम्म मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी.एफ. कोचे हे होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.अनिल कान्हेकर, अॅड.अमरदीप चवरे, प्रिया शहारे, टी.यु. गेडाम, अचल मेश्राम, मदनपाल गोस्वामी, मंगेश हुमणे, सिद्धार्थ गजभिये, आहुजा डोंगरे, संजय बन्सोड, अरुण अंबादे, गजानन पडोळे, सरपंच सुरेश शेंदरे, भीमराव लाडे उपस्थित होते.
प्रेमसागर गणवीर म्हणाले, बौद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा उमटलेल्या या दशबल पहाडी पर्यटनस्थळाच्या विकासाकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. याकरिता प्रशासनाने लक्ष देऊन या स्थळाचा विकास करावा.
डी.एफ. कोचे म्हणाले, बौद्ध धम्म ही व्यक्तीची व मानवी मुक्तीची आचारसंहिता आहे. धम्म हा दैनंदिन जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे.
माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी म्हणाले, धर्मामध्ये ईश्वराला जे स्थान आहे तेच स्थान बौद्ध धम्मात नीतीला आहे. नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती, हे आपण समजून घेतले पाहिजे.
तत्पूर्वी सकाळी त्रिरत्न वंदना व धम्मध्वजारोहण धम्मज्योती यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये यांच्या संचालनात शहापूर येथून दशबल पहाडीपर्यंत धम्मरॅली काढण्यात आली. तद्नंतर दशबल पहाडी येथील विहारात भिक्खूनी संघप्रिया, भिक्खू वकुली, भदन्त मिलिंद, भदन्त डॉ.धम्मदीप, भदंत रत्नाकर, भदन्त रत्नधातू, भदन्त धम्मज्योती, भिक्खुणी विशाखा, भिक्खुणी शीलाचारा यांची उपस्थिती होती. बुद्धवंदना, बुद्धपूजा व महामंगल सुत्त पठनाने श्रीलंकेहून आणलेल्या बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर लगेच धम्मदेशनेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यात भदन्त डॉ.धम्मदीप, भदन्त धम्मज्योती, भदन्त वक्कली, भिक्खुणी संघप्रिया यांनी उपासक उपासिकांना धम्मदेशना दिली. त्यानंतर महेंद्र गडकरी, प्रेमसागर गणवीर, अमृत बन्सोड, डी.एल. कोचे, मदनपाल गोस्वामी यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीचे अनावरण करण्यात आले. रात्री समाजप्रबोधनकार भगवान गावंडे यांचा जाहीर गायनाचा कार्यक्रम झाला.
संचालन महेंद्र वाहणे यांनी केले. उपस्थितांचे आभार ट्रस्टचे संस्थापक सचिव संघप्रिया यांनी मानले. यशस्वितेसाठी देवानंद नंदागवळी, जितेंद्र खोब्रागडे, मनोज घरडे, मोरेश्वर गजभिये, प्रदीप नारनवरे, मनोज चवरे, उमेश गजभिये यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)