आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:19 AM2018-05-09T01:19:49+5:302018-05-09T01:19:49+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १० मे असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १० मे असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीसंबंधी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी काळे यांनी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात रोकड वाहतूक व दारूच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्यात असलेल्या मतदान केंद्रांचा आढावा घेऊन केंद्र निश्चित करण्यात यावे. यात संवेदनशिल, अतिसंवेदनशिल मतदान केंद्राची निश्चिती करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी स्ट्राँग रूम तयार करण्यात यावी. स्टॅटिक्स सर्व्हेलन्स चमू व व्हिडिओ पथक नेमन्यात यावे. निवडणुकीच्या निमित्ताने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सभा होत असतात. ही बाब लक्षात घेऊन परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी.
सभेची परवानगी देताना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे धोरण राबविण्यात यावे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलीकॉप्टरची परवानगी आवश्यक असल्यास त्या अनुषंगाने परवानगी द्यावी, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय विना परवानगी कोणतीही सभा किंवा रॅली निघणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. निवडणूक प्रचारासाठी विविध पक्ष पॉम्पलेट व हॅण्डबील प्रकाशित करतात, त्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिकारी व कर्मचाºयांच्या प्रशिक्षणाच्या तारखा निश्चित करून त्यांचे तात्काळ प्रशिक्षण घ्यावे. यामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण योग्य प्रकारे देण्याच्या सूचनाही केल्या. निवडणूक निरिक्षक १० मे रोजी येणार असून मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात. आचारसंहिता भंग झाल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करावा. आचारसंहितेच्या गुन्ह्यासाठी पोलीस विभागाने स्वतंत्र नोंदवही ठेवावी, अशा सूचना या बैठकीत करण्यात आले. पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयाने काम करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे यांनी मतमोजणीसाठी समाजिक न्याय भवनाची पाहणी केली. बैठकीला भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, गोंदियाचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदार उपस्थित होते.