कोरोना रोखण्यासाठी कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 05:00 AM2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:45+5:30
गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, खात रोड, लाल बहादूर शास्त्री चौक, बसस्थानक परिसर, मोठा बाजार यासह शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. मात्र असे असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे दिसत होते. शहरालगतच्या गणेशपूर परिसरात हा बंद नव्हता त्यामुळे अनेक जण गणेशपूर येथे जाऊन चहा-खर्राची व्यवस्था करताना दिसत होते. एकीकडे व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगदान दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून दर मंगळवारी सर्व आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश नगर परिषदेने दिले होते. या आदेशानुसार पहिल्या मंगळवारी शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. औषधीची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. बंद काळात उघडे ठेवणाऱ्या चार दुकानांवर नगर परिषदेच्या पथकाने कारवाई केली. शहरातील सर्व दुकाने बंद असली तरी नागरिक मात्र विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे चित्र दिवसभर होते.
भंडारा शहरात गत काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही गर्दी करीत आहे. यासाठी नगर परिषदेने १९ मार्च रोजी एक आदेश निर्गमित करून सर्व दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ केली आहे. यासोबतच दर मंगळवारी सर्व आस्थापना आणि दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या मंगळवारी शहरातील दुकानदारांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहरातील प्रत्येक भागातील दुकाने बंद होती. सर्व सामसूम दिसत होते.
गांधी चौक, राजीव गांधी चौक, त्रिमूर्ती चौक, खात रोड, लाल बहादूर शास्त्री चौक, बसस्थानक परिसर, मोठा बाजार यासह शहरातील सर्व भागातील दुकाने बंद होती. मात्र असे असले तरी अनेक जण विनाकारण रस्त्यावर भटकंती करीत असल्याचे दिसत होते. शहरालगतच्या गणेशपूर परिसरात हा बंद नव्हता त्यामुळे अनेक जण गणेशपूर येथे जाऊन चहा-खर्राची व्यवस्था करताना दिसत होते. एकीकडे व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी योगदान दिले. मात्र काही जण रस्त्यावर भटकून त्याला तडा देताना दिसत होते. शहरातील चार दुकानांवर नगर परिषदेच्या पथकाने कारवाई करून प्रत्येकी दीड हजार रुपये दंड वसूल केला. या दुकानदारांना नगरपरिषदेने समज दिली. शहरात सकाळपासूनच बंदची चर्चा होती. नागरिकांनीही याला सहकार्य केले. त्यामुळे मंगळवारी बंद यशस्वी झाला.
शहरात सात ठिकाणी चेकपोस्ट
विनाकारण रस्त्यावर भटकंती करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी शहरातील मुख्य सात चौकात नगर परिषद चेकपोस्ट उभारणार आहे. त्या ठिकाणी शहरात फिरणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, गांधी चौक आणि शास्त्री चौकात चेकपोस्ट उभारले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली. तसेच शहरातील सर्व आस्थापनामधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना दंड
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या कार्यालयातच तीन कर्मचारी विना मास्क असल्याचे दिसून आले. तिघांना प्रत्येकी १५० रुपये दंड आणि कारणे दाखवा नोटीस बजावली.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे, विनाकारण कुणीही रस्त्यावर भटकंती करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सहकार्यानेच भंडारा शहर कोरोनामुक्त होणार आहे.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद, भंडारा.