जिल्ह्यात मान्सूनची दमदार एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 05:00 AM2022-06-20T05:00:00+5:302022-06-20T05:00:21+5:30
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. यापूर्वीही हवामान खात्याने १५ जूननंतर मान्सून पूर्व विदर्भात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली होती. त्याचवेळी १८ जूनपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. शनिवार रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. विजांच्या गडगडाटासह चार ठिकाणी वीज कोसळली. तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या वृक्षावर वीज कोसळल्याने झाड पेटले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हावासीयांसह शेतकऱ्यांना बरसलेल्या मृगधारांमुळे सुखावला आहे. शनिवार व रविवारी सकाळी मान्सूनच्या दमदार एन्ट्रीमुळे खरीप हंगामाच्या मशागतीला प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे उष्णतेपासूनही जिल्हावासीयांची सुटका झाली आहे.
गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. यापूर्वीही हवामान खात्याने १५ जूननंतर मान्सून पूर्व विदर्भात दाखल होईल अशी शक्यता वर्तविली होती. त्याचवेळी १८ जूनपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. शनिवार रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस बरसला. विजांच्या गडगडाटासह चार ठिकाणी वीज कोसळली. तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या वृक्षावर वीज कोसळल्याने झाड पेटले. सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. अन्य एक घटना पवनी तालुक्यातील निलज बुज येथे घडली तर अड्याळ जवळील एका गावात बोअरवेलवर वीज कोसळली. चवथी घटना लाखांदूर तालुक्यातील पाउलदवणा येथे घडली. बाहेर बांधलेल्या जनावरांवर वीज कोसळल्याने गाय व बैल ठार झाले.
भंडारासह ग्रामीण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसल्याने शेतीच्या हंगामाला जोर आला आहे. मात्र धान खरेदी केंद्रावर आलेला धान ओला झाला. धान खरेदीचे उद्दिष्ट अजूनही वाढलेले नसल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कुचंबना होत आहे. मान्सुनचे आगमन रबी पिकांसाठी नुकसानदायक तर खरीपासाठी सुखकारक ठरत आहे.
किटाडी : मुसळधार पाऊस पडत नसल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली असल्याने शेतशिवारात शांतता पसरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. आज येणार, उद्या येणार कसे म्हणत कासावीस झालेला बळीराजा आकाशाकडे नजर लावून असताना अखेर मृग नक्षत्राच्या दहाव्या दिवशी दमदार मृगधारा बरसल्या. दमदार मृगसरींनी बळीराजा सुखावला आहे.
लाखनी तालुक्यातील किटाडी परिसरात शनिवार रात्री नऊ वाजताच्या सुमारास आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी दाटी केली. ढगांच्या गडगडाटासह क्षणातच दमदार पावसाचे आगमन झाले. अर्धा तास पावसाच्या दमदार सरी कोसळल्या व त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस पडतच होता. उष्णतेच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना वातावरणातील थंडाव्याने दिलासा मिळाला.
यावर्षीचा उन्हाळा अत्यंत उष्ण राहिल्याने जोरदार पाऊस पडल्याशिवाय मशागत अशक्य आहे. शेतकऱ्यांसह सर्वांनाच जोरदार पाऊस पडण्याची आतुरता होती. यावर्षीचा पावसाळ्यातील मृग नक्षत्रातील अर्धा तास बरसलेला पहिलाच दमदार पाऊस जमिनीलाच काय तर शेतीविश्वाच्या परिघातील साऱ्यांनाच सुखावून गेला. पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास मशागतीच्या कामांना वेग येईल.
पाऊस आला, वीज गेली
- किटाडी परिसरात शनिवारी रात्रीला विजेचा कडकडाट, वादळ वाऱ्यासह पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळाने वादळवारा शांत होऊनही वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. अखेर तीन तासांनंतर विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
वीज कोसळून बैल व गाईचा मृत्यू
- लाखांदूर : शनिवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यात मेघ गर्जनेसह विजेच्या कडकडाटात अचानक वीज कोसळल्याने एका बैलासह गाईचा मृत्यू झाल्याची घटना पाउळदवना येथे घडली. या घटनेत तेजराम पुनाजी हत्तिमारे (रा. पाउळदवना) नामक शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्याने घरालगतच्या झाडाला घटनेतील दोन्ही जनावरे बांधून ठेवली होती. अचानक मेघगर्जना होऊन विजांचा कडकडाट सुरू झाला. अचानक घरालगतच्या झाडाला बांधून ठेवलेल्या दोन्ही जनावरांवर वीज कोसळली. दोन्ही जनावरांचा जागीच मृत्यू झाला. नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
बोअरवेलवर वीज कोसळली, जीवितहानी टळली !
- अड्याळ : अड्याळजवळील विरली खंदार येथे शनिवारी आलेल्या मुसळधार पावसानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास रामकृष्ण जिभकाटे यांच्या अंगणातील बोअरवेलवर वीज कोसळली. यामुळे घरातील विद्युत मीटरला असणाऱ्या वायरचे तुकडे पडले. बोअरवेलला असणारी केबल तथा प्लास्टिक पाईपचे अनेक तुकडे झाले. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अड्याळ व परिसरात पहिल्यांदाच दमदार पावसाने हजेरी लावली. वीज कोसळली यामुळे संपूर्ण गाव थोड्यावेळापुरता का असेना हादरला. वीज कुठेतरी जवळपास कोसळली असावी असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास जिभकाटे यांच्या घराकडे धाव घेतली. बोअरवेलवर वीज कोसळली होती. घटनेची माहिती विरली खंदार येथील तलाठी इंगळे यांना देण्यात आली. पंचनामा करण्यात आला.