आयुष्याच्या सांजवेळी निवाऱ्यासाठी धडपड

By admin | Published: January 5, 2016 12:34 AM2016-01-05T00:34:49+5:302016-01-05T00:34:49+5:30

अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी लोकशाही देशात त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र त्याची एक निश्चित मर्यादा असावी.

The struggle for the shelter during the evening of life | आयुष्याच्या सांजवेळी निवाऱ्यासाठी धडपड

आयुष्याच्या सांजवेळी निवाऱ्यासाठी धडपड

Next

पवनी : अन्न, वस्त्र, निवारा मानवाच्या मुलभूत गरजा असल्या तरी लोकशाही देशात त्या टप्प्याटप्प्याने प्राप्त होत असतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र त्याची एक निश्चित मर्यादा असावी. परंतु पवनी येथील एका वृद्धेच्या नशिबी निवाऱ्याची सोय मागील पाच दशकांपासून अपुरी आहे. शासनाचे उंबरठे झिजवूनही तिला व तिच्या मुलासाठी हक्काचे घरकुल मिळालेले नाही. बसंती परसराम मेश्राम रा.शुक्रवारी वॉर्ड असे या महिलेचे नाव आहे.
बसंती मेश्राम यांचे सासरकडील मंडळी मागील पाच दशकांपासून उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. सदर वृद्धेचे पती परसराम हे विमनस्क असल्याचे नागरिक सांगतात. कधी वाजंत्री वाजवून तर कधी भिक्षा मागून तर कधी कपड्यांची तुरपाई करून कुटुंबाचा गाढा ते ओढत होते. एके दिवशी आझाद चौक येथील एका भिंतीच्या आडोशाला परसराम बसले असताना ती भिंत कोसळली. त्याच ढिगाऱ्याखाली दबून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचविण्याचे काहींनी प्रयत्नही केले. मात्र नियतीला ते मान्य नव्हते.
बसंती या वृद्ध महिलेवर आभाळ कोसळले. परसराम यांची अंत्ययात्रा व तेरवीचा कार्यक्रम पैसे गोळा करून आटोपण्यात आला. दुसरीकडे मतीमंद मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी बसंतीच्या खांद्यावर आली. पतीचा अपघाती मृत्यू झाल्याने बसंती यांना शासकीय मदत मिळावी यासाठी वॉर्डातील प्रा.उषाकिरण सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले.
मात्र शिधापत्रिका, मुलाचे मतदान ओळखपत्र व बिपीएल क्रमांक नसल्याने अपघात निधी मिळण्यास अडचण निर्माण झाली. आजही तो निधी मिळालेला नाही. संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मागील दीड वर्षांपासून तहसील कार्यालयात धुळखात आहे. घरकुल मिळावे यासाठी बसंती मेश्राम यांचा संघर्ष पाच वर्षांपासून अविरतपणे सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)
दिवसातून एकदाच पेटते चूल
उघड्यावर पडलेल्या काड्या व लाकूड वेचून दिवसातून एकदा चुल पेटते. वृद्धेचा मुलगा अल्पमजुरीत काम करतो. वॉर्डाबाहेर काही इसम मायलेकाला चिडवीत असल्याने दोघेही वॉर्डाबाहेर जात नाही. जेवण केल्यावर वॉर्डातील ज्ञानांकुर बौद्धविहार येथील टिनाच्या पत्र्याखाली आसरा घेतात. घरकुल नसल्याने पावसाळ्यात पाण्याची झडप, हिवाळ्यात बोचरी थंडी व उन्हाळ्यात उकाड्याचे चटके सहन करावे लागतात. शासन गरीबांसाठी अनेक योजना राबवित असले तरी ती योजना बसंतीसाठी नाही काय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सेवाभावी संस्था, समाजसेवक, लोकप्रतिनिधी बसंती नामक या वृद्धेची व्यथा आत्मसात करून मदत करतील काय? अशी अपेक्षा आहे.

Web Title: The struggle for the shelter during the evening of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.