जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांचा जीवन जगण्याचा संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:21+5:302021-05-20T04:38:21+5:30
भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात अनेक प्राचीन कला व उत्सव साजरे केले जातात. या सोबतच ...
भंडारा जिल्हा हा झाडीपट्टीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यात अनेक प्राचीन कला व उत्सव साजरे केले जातात. या सोबतच परंपरागत बोली भाषा जपून त्यातून मनोरंजनाचे व जन प्रबोधनाचे कार्यही कलावंतांच्या माध्यमातून होत आले आहे. दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात मंडई उत्सवाचे आयोजन केले जाते. या मंडई उत्सवाच्या माध्यमातून तमाशा, गोंधळ, नाटक, पोवाडा, कीर्तन व अन्य उपक्रमांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांच्या माध्यमातून कलावंतांना काम मिळत असते. त्यातूनच ते वर्षभर थोडीफार मदत होईल अशी जमापुंजी गोळा करीत असतात. मात्र गत वर्षापासून कोरोना महामारीने त्यांच्यावरही गंडांतर आणले आहे. मंडई उत्सव व सण साजरे झाले नसल्याने त्यांनाही काम मिळाले नाही. हाताला काम न मिळाल्याने त्यांच्यावर मोठे संकट आले आहे. अशातच सप्टेंबर २०२० पासून शासनाने देऊ केलेले २,२५० रुपयांचे मानधनही गत आठ महिन्यांपासून अदा केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. प्राचीन कलेचा वारसा जोपासणाऱ्यांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. शासन व प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे लक्ष द्यावे अशी मागणी वृद्ध कलावंतांनी केली आहे. मानधन देण्याची मागणी वृद्ध कलावंत साबितराव गजभिये, भीमराव निंबार्ते, अशोक मानकर, लक्ष्मण बावणे, आसाराम बावणे, बाळकृष्ण शेंडे, श्यामराव लिचडे, धोंडू केवट, लक्ष्मण मानकर, श्रीपत बोपचे, सुदाम बागडे आदींनी केली आहे
कोट
साहेब जगायचे कसे
गत आठ महिन्यांपासून आम्हाला मानधन मिळाले नाही. त्यातही मंडई उत्सव रद्द झाल्याने उदरनिर्वाहाचा खर्चही यावेळेस मिळाला नाही. आयोजन नसल्याने हाताला काम मिळाले नाही. जगण्याचे एकमेव आधार व शासन देत असलेले मानधन आठ महिन्यांपासून मिळाले नाही. आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित झाला आहे.
-भीमराव निंबार्ते, वृद्ध कलावंत
मालीपार, ता. भंडारा