विदर्भासाठी संघर्ष सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:28 PM2017-12-01T22:28:23+5:302017-12-01T22:29:52+5:30
आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो.
लोकमत आॅनलाईन
मोहाडी : आदरातिथ्य करणे आपली संस्कृती आहे. शब्द पाळण्याची ताकद नेत्यांमध्ये नाही. मागण्या तशाच राहतात. घोषणा हवेतच विरतात. हिवाळी अधिवेशनात नागपूरला येऊन पर्यटन केले जाते. गुलाबी थंडीचा आस्वाद घेतला जातो. अधिवेशन संपले की हात पुसत निघून जातात असा आरोप ज्वाला धोटे यांनी करत आता विदर्भासाठी संघर्ष चालूच राहणार, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कान्हळगाव (सिर) येथे महिलांचे कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी त्या आल्या होत्या. मोहाडी येथील विश्रामगृहात त्यांची पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विदर्भासाठी लढणारे जांबुवंतराव धोटे यांची कन्या ज्वाला धोटे म्हणाल्या, सध्याचे सरकार मार्केटिंग करीत आहे. स्वप्न दाखवून भुरळ पाडत आहे. त्या स्वप्नांना आकार देणे व साकारणे महत्वाचे असते. पण ते होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाच्या जाहीरनाम्यात विदर्भ वेगळा देऊ असे सांगितले गेले. विदर्भाच्या जनतेनेही साथ दिली. पण, सत्तेत येताच विदर्भावर बोलणे टाळले जात आहे.
विदर्भाची निर्मिती होण्यासाठी जनतेची उत्साह स्फूर्ती शमली नाही. जांबुवंतरावांचे त्याग, बलिदान हे माझ्यासाठी सगळ्यात मोठी पूंजी आहे. ते माझे आदर्श असून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत विदर्भाकरिता लढा दिला असे सांगून या आंदोलनात अनेकजण जुळले आहेत. विचारांनी वेगळा विदर्भ व्हावा. आता टायगरची सिंहगर्जना होतच राहील. संघर्ष आपल्या रक्तात आहे. विदर्भासाठी लढा राहणार असल्याचे ज्वाला धोटे यांनी सांगितले. आईकडून राजकारण शिकलो अन् रक्तातच समाजकारण आहे. माझ्या वडीलांनी सत्ता अन् पदाची पर्वा केली नाही. ते जनतेच्या भल्यासाठी लढत राहिले. मनसे, शिवसेना विदर्भासाठी विरोध करतात. पण हे ठरविणारे कोण असा प्रश्न करून वेगळ्या विदर्भासाठी जनताच ठरवेल. मंचावरून बोलणे सोपे असते. त्यासाठी त्याग, संघर्ष, बलिदान, उपोषणही करावी लागतात. आज विदर्भ बेरोजगारी, विदर्भासाठी लढत झुंजत आहे. आता रस्त्यावर सगळ्यांनी उतरले पाहिजे. बाहेरच्या पाहुण्यांनी खपवून घेणार नाही. विदर्भासाठी शासनापुढे झोळीही पसरविणार नाही, असेही ज्वाला धोटे यांनी ठणकावून सांगितले.
कबड्डी खेळाबाबत बोलताना त्या म्हणाल्या कबड्डी शांत डोक्याचा खेळ आहे. या खेळात महिला समोर येत असल्याचा आनंद व्यक्त करीत शासनानी ग्रामीण भागातील खेळाडूंना सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण टेनीसपटू, बॅडमिंटन, कबड्डी आदी खेळात प्राविण्य मिळविले आहे, असे ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी असलम खातमी, सरपंच मेघा उटाणे, उपसरपंच राजू उपरकर,अनुप उटाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.