वीज प्रवाह असलेले तार कोसळले अंगावर, विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:31 AM2021-03-15T04:31:34+5:302021-03-15T04:31:34+5:30
खापा : कपडे धुण्याकरिता कुटुंबीयातील सदस्यांसोबत नाल्यावरील बंधाऱ्यावर गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणीवर विजेचे प्रवाहित असलेले तार कोसळले. ...
खापा : कपडे धुण्याकरिता कुटुंबीयातील सदस्यांसोबत नाल्यावरील बंधाऱ्यावर गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणीवर विजेचे प्रवाहित असलेले तार कोसळले. यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना तुमसर तालुक्यातील खरबी शेतशिवारात घडली. चित्रकला निरंजन बडवाईक असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. उल्लेखनीय म्हणजे बडवाईक यांच्याकडे १८ मार्च रोजी लग्न समारंभ आहे. ऐनवेळी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे आनंदावर विरजण पडले आहे.
माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील खरबी येथील रहिवासी असलेले बडवाईक कुटुंबीयांत १८ मार्च रोजी लग्नसमारंभ आहे. यासंदर्भात घराची स्वच्छता सफेदी व अन्य कार्य सुरू आहे. याच अंतर्गत रविवारी सकाळी बडवाईक कुटुंबीयातील सदस्य कपडे धुण्याकरिता खरबी विहीरगाव मार्गावरील शेतशिवारागतच्या नाल्यावर गेले होते. यावेळी बंधाऱ्याच्या पाळीवर कपडे धूत असताना नाल्यावरून गेलेल्या थ्रीफेज या विद्युत वाहिनीतील एक प्रवाहित तार कोसळून चित्रकला हिच्या अंगावर कोसळली. पाहता पाहताच अवघ्या काही सेकंदांतच चित्रकला ही त्या तारासोबत पाण्यात कोसळली. विजेच्या जबर धक्क्याने क्षणभरातच चित्रकलाची प्राणज्योत मालवली. होत्याचे नव्हते झाले. आरडाओरड करून सगळे गावकरी नाल्याच्या बंधाऱ्यावर जमले. चित्रकला ही मोहाडी येथील एका महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिक्षण घेत होती. चित्रकलाच्या मृत्यूने संपूर्ण गावातच शोकमग्न वातावरण निर्माण झाले. तिच्या मागे आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. तिच्या पार्थिवावर खरबी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची मोहाडी पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
बॉक्स
कुटुंबीयांना २० हजार रुपयांची मदत
सदर घटनेची माहिती तुमसर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिकारी व मोहाडी पोलीस ठाण्याला देण्यात आली. घटनास्थळी मोहाडी पोलीस व वीज वितरण कंपनीचे अधिकारी पोहोचले. पंचनामा करून चित्रकला हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी वीज वितरण कंपनीतर्फे बडवाईक कुटुंबीयांना तात्काळ स्वरूपात २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. मात्र, वीज वितरण कंपनीच्या या निष्काळजीपणामुळे एका तरुणीला नाहक जीव गमवावा लागला याची एकच चर्चा होती.