‘त्या’ विद्यार्थ्याला मिळाला मदतीचा हात
By admin | Published: November 22, 2015 12:29 AM2015-11-22T00:29:03+5:302015-11-22T00:29:03+5:30
येथील समर्थ महाविद्यालयातील अनिल गिऱ्हेपुंजे या विद्यार्थ्याला नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे आर्थिक मदत दिली.
विद्यापीठाचे सहकार्य : समर्थ महाविद्यालयाचा पुढाकार
लाखनी : येथील समर्थ महाविद्यालयातील अनिल गिऱ्हेपुंजे या विद्यार्थ्याला नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाद्वारे आर्थिक मदत दिली. गरजेच्या वेळी प्राप्त झालेल्या मदतीने या विद्यार्थ्याने विद्यापीठासह प्राध्यापक वृदांचे आभार मानले.
विद्यापीठाच्या पूर्णचंद्रराव बुटी सभागृहात आयोजित कार्यक्रमाला समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर, डॉ.संजय डाचेवार, डॉ.पाटणकर, प्राचार्य जयस्वाल, डॉ.धनंजय बेळूकर, डॉ.निहाल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी या विद्यार्थ्याला हस्ते ६५ हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाने कमवा व शिका या योजनेअंतर्गत हा निधी प्राप्त झाला.
माहितीनुसार, नागपूर लाखनी रेल्वेने प्रवास करीत असताना भंडारा रोड येथील रेल्वे स्थानकावर सदर विद्यार्थ्याचा अपघात झाला होता. यात त्याच्या मेंदूला जबर मार बसला होता. त्याच्यावर नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
कुटुंबाची हलाखीची परिस्थिती लक्षात घेता समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पोहरकर यांनी विद्यापीठाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. विद्यापीठाच्या निदर्शनास वरील बाब आणून दिली सरतेवशेवटी प्राचार्यांच्या कार्यास यश मिळाले. विद्यापीठाने आर्थिक सहाय्यता मंजूर केली. कारवाईकरिता आवश्यक सर्व कागदपत्रे व औषधांचा खर्च इ. तत्सम खर्चाची फाईल तयार करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाचे एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट प्रा.बाळकृष्ण रामटेके यांच्या सहकार्यातून पार पडले. वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन क्रीडा विभाग प्रमुख प्रा.धनंजय गिऱ्हेपुंजे यांचेकडून प्राप्त झाले. विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी विद्यापीठाचे आणि महाविद्यालयाचे आभार मानले. (तालुका प्रतिनिधी)