बसस्थानकाअभावी विद्यार्थ्यांचे हाल
By admin | Published: July 10, 2016 12:18 AM2016-07-10T00:18:29+5:302016-07-10T00:18:29+5:30
अड्याळ येथे बसस्थानकाची समस्या सुटलेली नाही. पावसाचे दिवस सुरू आहे. शुक्रवारच्या दिवशी सतत पाऊस सुरू असल्याकारणाने ...
सामाजिक संघटनांनी टेकले हात : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, बसस्थानक बांधणार काय
विशाल रणदिवे अड्याळ
अड्याळ येथे बसस्थानकाची समस्या सुटलेली नाही. पावसाचे दिवस सुरू आहे. शुक्रवारच्या दिवशी सतत पाऊस सुरू असल्याकारणाने काही शाळांना सुटी देण्यात आली. शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी सध्याच्या समस्याग्रस्त बसस्थानकावर आले, मात्र पावसात थांबायचे कुठे, असा प्रश्न येथील विद्यार्थ्यांना पडला. पाऊस सुरू होताच मुले या नाही त्या टपरीत गेले दुकानात गेले. बसस्थानकाअभावी या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.
ही व्यथा आहे अड्याळ बसस्थानकातील. एकंदरीत चार ज्युनीअर शाळांनी मोफत बससेवा सुरू केली असली तरी आजही महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसने बरेच विद्यार्थी प्रवास करताना दिसतात. परंतु अड्याळ हे पाच हजार लोकवस्तीचे गाव असून पावसात बसायला सोडा. उभे राहायला प्रवाशांना वा प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासी निवारा उपलब्ध नाही. यापेक्षा अड्याळवासियांचे दुर्देव कोणते.
बसस्थानकाजवळचे मुतारीघर आहे. या मुतारीघराची स्वच्छता क्वचितच केली जाते. ग्रामपंचायतीने व्यवस्था केली असली तरी वाईट दशा आता पावसाळा सुरू झाल्याने झाली आहे. दुर्गंधी तर नाहीच परंतु कचरा मात्र दिसतो. पंधरा दिवसातून याला साफ केल्या जात असल्याची माहिती आहे.
महत्वाचे म्हणजे इथे येणारा प्रवासी व जाणारा प्रवासी दोघांनाही दोन गोष्टीचा त्रास होत आहे. एक प्रवासी निवासाची व दुसरी शौचालय मुतारीघर. ज्या विद्यार्थ्याजवळ छत्री तो आपली व्यवस्था करतो. परंतु य्या विद्यार्थ्यांकडे छत्री किंवा रेनकोट नाही अशा विद्यार्थ्यांची पावसामुळे प्रचंड गैरसोय होते. येथील बसस्थानक एक गंभीर समस्या बनत आहे. ही समस्या सोडवायला इथून जाणारे आमदार क्षेत्राचे लोकप्रतिनिधी, गाव क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, गाव परिसरातील सामाजिक संघटना कुणीतरी येवून हा सर्वांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होताना दिसत आहे.
येथील ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य वा जिल्ह्याचे आमदार, खासदार असो यांनी जर मनावर आणले तर काय नाही होऊ शकते. ही समस्या एका दिवसात निकाली निघू शकते, असे मत विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीकडे व्यक्त केले. समस्या एकाची नसून प्रत्येक प्रवाशांची आहे. त्यासाठी ही समस्या तातडीने सुटावी हीच मागणी येथे भिजणाऱ्या व सोयी उपलब्ध नसणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केले आहे.