आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळते अवेळी भोजन
By admin | Published: February 11, 2017 12:21 AM2017-02-11T00:21:05+5:302017-02-11T00:21:05+5:30
शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दोन्ही वेळच्या भोजनातील अंतर १६ तासापेक्षा जास्त आहे.
प्रकृती खालावली : आदिवासी आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
तुमसर : शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दोन्ही वेळच्या भोजनातील अंतर १६ तासापेक्षा जास्त आहे. भोजनाची वेळ सायंकाळी ७.३० तर दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ असे आहे. याविरोधात भाजप आदिवासी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तुमसर तहसीलदारांमार्फत निवेदन दिले.
राज्य शासनाने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसा आदेश राज्य शासनाने २२ डिसेंबर २०१६ ला काढला. यात अनेक त्रुट्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार येथे वरज्यात आला नाही. विद्यार्थ्यांची रात्रीची जेवनाची वेळ ७.३० वाजता आहे. दुसऱ्या दिवशी दूपारी १२.४५ ला ठेवण्यात आली. दोन्ही वेळेत सुमारे १६ तासांचे मोठे अंतर आहे. राज्यात इतर निवासी शाळात जेवनाची वेळ सकाळी १० वाजता ठरलेली आहे. आश्रमशाळेची भोजनाची वेळ तीन तास उशिरा ठेवण्यात आली आहे.
आश्रमशाळा सुरु होण्याची वेळ सकाळी ९.४५ ची आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा न धड जेवन ना अभ्यास अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक आश्रामशाळेतील विद्यार्थी प्रार्थनेच्या वेळेत उपाशीपोटी बेशुध्द होऊन पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या विरोधात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी आघाडीकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
फेब्रुवारी व मार्च महिन्यात इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परिक्षा सुरु होत आहेत. परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना केवळ न्याहारीवर जावे लागणार आहे. या विरोधात विद्यार्थ्यांच्या पालकासोबत तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, महासचिव अशोक उईके, प्रथा पेंदाम, संजय गत्राम, गजानन धुर्वे, संजय भलावी यांनी दिले आहे. डॉ. सुभाष साळुंखे समिती आदिवासी आश्रमशाळेतील दिलेले वेळापत्रक त्वरित बदलविण्याची मागणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा ना. आत्राम यांना निवेदन पाठविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)