अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकले विद्यार्थी; एक हजाराचे झाले ४९ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 05:26 PM2020-09-22T17:26:13+5:302020-09-22T17:26:33+5:30
तुमसर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर अवैध सावकारीचे वास्तव पुढे आले. अल्प रकम व्याजाने घेतल्यानंतर ती फिटता फिटत नाही. वसुलीच्या तगाद्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अवैध सावकारीचा विळखा शेतकऱ्यांसोबतच विद्यार्थ्यांच्या मानेभोवती घट्ट आवळला जात आहे. तुमसर तालुक्यातील एका विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येनंतर अवैध सावकारीचे वास्तव पुढे आले. अल्प रकम व्याजाने घेतल्यानंतर ती फिटता फिटत नाही. वसुलीच्या तगाद्याने अनेक विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अशा स्थितीत पोलीस यंत्रणा अवैध सावकारीला उसणवारीचे रुप देवून प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न करतात.
तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील आदित्य एकनाथ चौरागडे (१७) या विद्यार्थ्याने १ सप्टेंबर रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती.
त्यापूर्वी तो मानसिक दृष्ट्या खचल्याने त्याच्यावर नागपूरात उपचारही करण्यात आले. आदित्यची आत्महत्या अवैध सावकाराच्या तगाद्याने झाल्याची तक्रार वडीलांनी सिहोरा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी मात्र या प्रकरणी गांभीर्य न दाखविता, जुजबी गुन्हे नोंदविले. खरे पाहता आदित्यचा बळी हा अवैध सावकारीने गेल्याचे त्याचे वडील एकनाथ चौरागडे सांगतात.
आदित्य हा तुमसर येथील नेहरु विद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होता. वर्षभरापूर्वी त्याने २० टक्के व्याज दराने एक हजार रुपये मित्राकडून घेतले होते. एक हजार रुपये परत करण्यासाठी त्याने दुसऱ्याकडून तीन हजार रुपये घेतले. तीन हजार परत करण्यासाठी पाच हजार असे पैसे परत करण्याच्या प्रयत्नात त्याच्यावर ४९ हजार रुपये झाले. या पैशासाठी सावकारांनी त्याच्यामागे तगादा लावला.
हा प्रकार घरच्यांना मात्र माहित नव्हता. मात्र त्यांच्या वागणुकीवरून वडीलांनी केली असता सावकारी पैशात तो अडकल्याचे पुढे आले. मानसिक संतुलन बिघडल्याने आदित्यवर नागपूर येथे उपचारही करण्यात आले. मात्र याही काळात पैशाचा तगादा सुरुच होता. दरम्यान वडीलांनी एका व्यक्तीचे पाच हजार रुपये परतही केले. मात्र आदित्य मानसिकदृष्ट्या खचत गेला आणि १ सप्टेंबर रोजी त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
आदित्यच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमधील अवैध सावकारीचा भंडाफोड झाला परंतु आजही पोलीस अवैध सावकारी मानायला तयारच नाही. उसणवार दाखवून प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदित्य सारखे अनेक विद्यार्थी अशा सावकारी पाशात अडकले आहेत. महाविद्यालयीन तरुणांकडे सध्या स्मार्टफोन, मोटारसायकल असते. खर्च करण्यासाठी घरुन मोजकेच पैसे मिळतात. त्यामुळे हे विद्यार्थी मित्राच्या माध्यमातून सावकाराच्या जाळ्यात अलगद अडकतात. तब्बल २० टक्क्यापर्यंत व्याजदराने पैसे घेतात, परतफेड झाली नाही की, मग मानसिक संतुलन बिघडते. अनेक विद्यार्थी आज अशा अवस्थेत असून त्यांना या सावकारी पाशातून बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र कुणीही पुढाकार घेत नसल्याने या सावकारी प्रवृत्तीचे चांगलेच फोफावत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दावेझरी येथील विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणी सिहोरा पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. गुन्हा दाखल झालेले आरोपी मोकाट फिरत आहे. या सर्वांना अटक करावी, अशी मागणी एकनाथ चौरागडे यांनी सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. माझ्या मुलाचा अवैध सावकारीत बळी गेला. मात्र इतर विद्यार्थ्यांचा बळी जावू नये, त्यामुळे पोलिसांनी या अवैध सावकारीचे पाळेमुळे खोदून काढावी, अशी विनंती चौरागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. आता पोलीस काय निर्णय घेते आणि अवैध सावकाऱ्यांच्या मुसक्या कशा आवळते याकडे लक्ष लागले आहे.