विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:38+5:30
येथील हुतात्मा स्मारकापासून डॉ. महेंद्र गणवरी, जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्रिमुर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पोलीस भरतीत जिल्ह्यामध्ये ओबीसी प्रवर्गला एकही जागा तर राज्यात नाहीच्या बरोबर जागा उपलब्ध नसल्याने भरती प्रक्रीया रद्द करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चाच्यावतीने गुरुवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
येथील हुतात्मा स्मारकापासून डॉ. महेंद्र गणवरी, जिल्हाध्यक्ष योगेश शेंडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. त्रिमुर्ती चौकात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. शासन प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्या सोडविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकजुटीच्या माध्यमातून एकत्रीत येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ओबीसी प्रवर्गावर अन्याय होत असून या यासाठी लढा देण्याची तयारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भंडारा येथे ओबीसी प्रवर्गासाठी वसतीगृहाची स्थापना करावी, इतर शासकीय वसतीगृहात ओबीसी प्रवर्गाच्या जागेत वाढ करावी, ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करावी, स्वाधार योजना लागु करावी, शिष्यवृत्तीत वाढ करावी, इतर प्रवर्गाच्या देखील शिष्यवृतीत वाढ करावी, खाजगीकरण त्वरीत थांबवावे, रोजगार निर्मितीसाठी विदर्भ राज्याची स्थापना करावी यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
या मोर्च्यात बीआरव्हीएमचे जिल्हा सचिव पंकज पडोळे, ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते, संभाजी बिग्रेडचे यशवंत भोयर, संदानंद इलमे, भैय्याजी लांबट, वासंती भूरे, निशा पारधी, हर्षीला बडोले, नेहा जांभूळकर, प्रेरणा नंदागवळी, पूजा सार्वे, गौरी डहाके, रितीका शेंडे, पलाश चुटे, शामित गजघाटे, अंजली गजघाटे, अंजली भाजीपाले, रुपाली चाचेरे आदी उपस्थित होते.