गाडीचा आवाज आला की विद्यार्थी घेतात धाव; शिक्षकाचे फिरते वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 09:47 PM2020-09-22T21:47:58+5:302020-09-22T21:50:06+5:30
लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे.
चंदन मोटघरे
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाने सध्यस्थितीत अनिश्चित काळासाठी शाळा बंद आहेत. शासन स्तरावरून शाळा बंद ...पण शिक्षण आहे ही अभ्यासमाला सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने शिक्षण काही ठिकाणी जवळपास ठप्प पडल्याचे चित्र आहे.
मात्र असे असले तरीही काही शिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून शिक्षणात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे.
त्यांनी आपल्या स्वत:च्या मोटार सायकलच्या सिटवर प्लायवूडची पेटी बांधून त्यात शालेय बाल वाचनालयातील पुस्तके ठेवून ती विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचवून देत आहेत. आपल्या मोटार सायकलला विशिष्ट आवाज करणारा हॉर्न लावला असून तो आवाज ऐकताच विद्यार्थी मास्कसह पटापट पुस्तके घेण्यासाठी घराबाहेर धाव घेतात. वाचनासाठी दिलेल्या पुस्तकांमधूनच लेखन करावयास सांगून विद्यार्थ्यांना कृतिशिल ठेऊन त्यांच्या वाचनात व लेखनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडाराचे जेष्ठ अधिव्याख्याता गुलाब राठोड, विस्तार अधिकारी राघोर्ते, केंद्रप्रमुख वाढीवे, आत्राम, दुधकवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. अनेक शिक्षकाकडूनही उपक्रमाचे कौतुक होत असून आपल्या शाळेत हा उपक्रम प्रत्यक्ष राबवण्याचा निर्धार केला आहे.
गाडीचा आवाज ऐकताच विद्यार्थी घेतात धाव
शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी फिरत्या बाल वाचनालयाच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचनाची आवड जोपासली आहे. यासाठी ते आठवड्यातून दोनवेळा पुस्तके बदलासाठी दुचाकीवरुन फिरतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी नवनवे उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा सहभाग वाढला आहे. विद्यार्थी गाडीचा आवाज ऐकताच गाडीकडे धाव घेतात. कोरोनाची दक्षताही घेत असल्याचे झोडे यांनी सांगितले.