ग्रामीण भागातील विद्यार्थिनी विद्यापीठात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:27+5:30
मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले.
दयाल भोवते।
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : ग्रामीण प्रतिभेला योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले तर काय होऊ शकते याचे जीवंत उदाहरण लाखांदूर तालुक्यातील पाहुणगाव येथे बघावयास मिळते. अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेल्या एका विद्यार्थिनीने गोंडवाना विद्यापीठातून समाजकार्य पदव्युत्तर पदवी गुणवत्तेसह प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींपुढे तिने आदर्श निर्माण केला.
मुन्नी गोपाल कावळे असे गुणवंत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती पाहुणगाव येथील रहिवाशी आहे. वडील गोपाल कावळे अल्पभूधारक शेतकरी असून त्याच्यावरच उपजिवीका आहे. तीची आईही शेतात राबते. मात्र या कुटुंबात शिक्षणाला महत्व दिले जाते. आई-वडील मुलांच्या शिक्षणाकडे जातीने लक्ष देतात. मुन्नी हिच्या प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत घरच्यांनी सहकार्य केले. खरे पाहता मुन्नीचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी घेतले. शाळेत जाताना ती दररोज सायकलने जायची.
शालेय शिक्षणापासूनच तिला समाजसेवेची आवड होती. याच क्षेत्रात करिअर करण्याचा निश्चय केला. त्यामुळे तिने बारावीनंतर बीएसडब्लू अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. गडचिरोली येथे जाऊन तिने बीएसडब्लू पूर्ण केले. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तीने त्याच महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकत्याच लागलेल्या निकालात मुन्नी कावळे गोंडवाणा विद्यापीठातून प्रथम मेरिट आली. हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवत मुन्नीने तालुक्याच्या शिरात मानाचा तुरा खोवला. तिचे तालुक्यात कौतुक केले जात आहे.
ग्रामीण प्रतीभा
मुन्नी कावळे या विद्यार्थिनीने ग्रामीण प्रतीभा सिद्ध करून दाखविली. विविध अडचणींचा सामना करीत तिने उच्च शिक्षण घेतले. प्रत्येक परीक्षेत ती गुणवत्ता यादीत चमकत गेली. समाजकार्य विषयाची पदव्युत्तर पदवी तिने विद्यापिठातून प्रथम क्रमांकाने प्राप्त केली. आता तिला ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करावयाचा आहे. तिने जे ग्रामीण भागात अनुभवले त्या समस्या तिला उजागर करून सोडविण्यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. ग्रामीण महिलांच्या समस्यांवरही तिला काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातून आलेली ही विद्यार्थिनी समाजकार्य विषयातून आता आपल्या गावालाच नव्हे तर परिसराला विकसित करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.