विद्यार्थ्यांनी ‘कलेक्टर’ होण्याचे स्वप्न बाळगावे
By admin | Published: January 5, 2017 12:41 AM2017-01-05T00:41:06+5:302017-01-05T00:41:06+5:30
कलेक्टर होण्यासाठी मराठी भाषेत परीक्षा देता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाऊन आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बाळगावे ...
पवनीत मिशन आयएएस उपक्रम : नरेशचंद्र काठोळे यांचे प्रतिपादन
पवनी : कलेक्टर होण्यासाठी मराठी भाषेत परीक्षा देता येते. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाऊन आयएएस परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बाळगावे व डॉक्टर, इंजिनिअर या व्यतिरिक्त करीअर करून आपले आयुष्य प्रशासकीय सेवेत घालवून पत प्रतिष्ठा मिळवावी. कलेक्टरच्या परीक्षेत १८० प्रश्न विचारले जातात. या परीक्षेची भिती बाळगू नका. जागे व्हा, असे आवाहन मिशन आयएएस अंतर्गत डॉ. नरेंशचंद्र काठोळे (अमरावती) यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, स्पर्धा पूर्व परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी प्रशांत भाग्यवंत, वनक्षेत्र अधिकारी डी.व्ही. बारई, नागभिड येथील गुणवंत विद्यार्थी गुंतेवार, प्राचार्य अनिल राऊत, राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडेकर, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रृघ्न बिरकड, कार्याध्यक्ष अशोक पारधी, सचिव सतीश जगताप, संघटक बळीराम झामरे, उपमुख्यापिका उषा चऊत्रे, पर्यवेक्षिका माधवी भूते उपस्थित होते. डॉ. काठोळे म्हणाले, आई-वडिलांनी देखील आपल्या पाल्याकडून या दृष्टीने तयारी कयन घ्यावी. आयुष्यात सफल व्यक्ती काही वेगळे करीत नाहीत तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात. बिहार, उत्तरप्रदेशात सर्वांना कलेक्टर व्हायचे असते तर महाराष्ट्रातील विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर होण्यापलीकडे विचार करीत नाही. सामान्य ज्ञानावर आधारित रोज ३० प्रश्न सोडवावे त्यामुळे शालेय जीवनात आपण एक लाख प्रश्नांचा सराव करू शकतो. रोज वर्तमानपत्र वाचा. वर्तमान पत्रातून सुमारे ७० टक्के प्रश्न विचारले जातात. स्थानिक वैनगंगा विद्यालयात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे संचालन सिमा कावळे यांनी केले.
याप्रसंगी सामान्य ज्ञान स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध खेळात यशस्वी विद्यार्थ्यांचा अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. आभार प्राचार्य अनिल राऊत यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)