विद्यार्थ्यांनी पाडली पात, शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:45 PM2019-08-05T22:45:30+5:302019-08-05T22:45:42+5:30
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी भर पावसात शालेय कविता म्हणत अर्धा तास रोवणी केली. विद्यार्थ्यांनी पाडली पात, अन् शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र आधुनिक शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते तुटत चालले आहे. शेतीत कुणी काम करायला नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल आस्था निर्माण व्हावी यासाठी लाखनी तालुक्यातील मिरेगाव शाळेने अभिनव उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी भर पावसात शालेय कविता म्हणत अर्धा तास रोवणी केली. विद्यार्थ्यांनी पाडली पात, अन् शेतकऱ्यांनी दिली कौतुकाची थाप.
शिक्षकांनी मनावर घेतले तर कोणताही उपक्रम यशस्वी होऊ शकतो. लाखनी तालुक्यातील मिरेगाव ही शाळा उपक्रमशिल शाळा म्हणून नावारुपास आली आहे. सर्जनशील आणि कल्पक शिक्षक येथे नानाविध उपक्रम राबवित आहेत. सध्या जिल्ह्यात भात रोवणीचा हंगाम सुरु आहे. विद्यार्थ्यांचे कृषीशी नाते घट्ट व्हावे यासाठी शाळेने रोवणीचा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला. शाळेचे मुख्याध्यापक डमदेव कहालकर यांनी आपल्या शिक्षकांना या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. भर पावसात विद्यार्थी उत्साहाने शेतात पोहचले. रोवण्याचे प्रात्याक्षीक शिक्षण देवून पाठ गिरविणे सुरु झाले. विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने गुडघाभर पाण्यात उभे राहून रोवणीचे काम केले. आपली मुले रोवणीच्य कामात तरबेज होत असल्याचे पाहून पालकही आनंदीत झाले. विद्यार्थ्यांचा पाठीवर कौतुकाची थाप दिली. शेतकरी, गावकरी आणि शाळा यांच्यातील दुरावा कमी झाला. मुख्याध्यापक डमदेव कहालकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे शेतीशी असलेले नाते घट्ट करण्यासोबतच त्यांना निसर्गाचे सानिध्य मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. निसर्गाेपचारामध्ये प्रकृती स्वास्थ्यासाठी मातीत गाठून घेतात. चिखलात पाय अधिक वेळ ठेवल्याने शरीरातील घातक द्रव्य माती शोषून घेते. या उपक्रमासाठी शिक्षक सहदेवकर, नाना कठाणे, चंद्रशेखर कापगते, पालिकांचद बिसने, यशवंत गायधने, केशव वडेकर आदीनी सहकार्य केले.